मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ‘आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025’दरम्यान ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आरोपी अकील ऊर्फ नायट्रा याचा अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासादरम्यान अकीलचा गुन्हेगारी इतिहास उघडकीस आला आहे. तो काही सर्वसामान्य आरोपी नाही तर इंदूरचा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. त्याच्या नावावर गुन्ह्यांची मोठी यादीच आहे. ऑस्ट्रेलिया संघातील दोन महिला क्रिकेटपटू जेव्हा त्यांच्या हॉटेलमधून बाहेर पडल्या, तेव्हा अकीलने त्यांच्यासोबत गैरवर्तणूक केलं. अकीलने त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत अश्लील कृत्य केलं. या घटनेनं महिला क्रिकेटपटूंना धक्का बसला असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आरोपीवर अनेक गुन्हे दाखलनायट्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकीलवर दरोडा, चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, ड्रग्ज तस्करी आणि अवैध दारू तस्करी यांसारख्या दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. या गंभीर गुन्ह्यांसाठी त्याला यापूर्वी शिक्षासुद्धा झाली होती. शहराील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तो वाँटेड गुन्हेगार होता. अकीलने अनेकदा तुरुंगवास भोगला असून अलीकडेच त्याची जामिनावर सुटका झाली होती.
नेमकं काय घडलं होतं?आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात सहभागी झालेल्या दोन ऑस्ट्रेलिनय महिला क्रिकेटपटू त्यांच्या हॉटेलमधून बाहेर पडून एका कॅफेच्या दिशेने चालत होत्या. त्याचवेळी एका व्यक्तीने मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग सुरू केला. खजराना रोड परिसरात महिला क्रिकेटपटूचा विनयभंग करून तो पसार झाला. दरम्यान दोन्ही खेळाडूंबरोबर झालेल्या विनयभंगाच्या घटनेवर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने निवेदनाद्वारे दु:ख व्यक्त केलं आहे.
शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंशी संबंधित या घटनेमुळे इंदूर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. छेडछाडीच्या आरोपाखाली अटक केलेला आरोपीच सराईत गुन्हेगार निघाला. पोलिसांनी वेळीच त्याच्यावर लक्ष ठेवलं असतं तर ही लज्जास्पद घटना टाळता आली असती, असं म्हटलं जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या घटनेनंतर पोलिसांनी आता आरोपीच्या मागील प्रकरणांची पुन्हा चौकशी सुरू केली आहे. तर प्रशासन परदेशी खेळाडूंसाठी सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्याची तयारी करत आहे.