टीम इंडियाची अनुभवी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे त्यांच्या कारकीर्दीतील अखेरच्या टप्प्यात आहेत. दोघेही टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेत. तसेच विराट आणि रोहितचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्यामुळे रोहित आणि विराटला ऑस्ट्रेलियात अखेरचं खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांनी शनिवारी 25 ऑक्टोबरला सिडनीतील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात मोठी गर्दी केली होती. रोहित आणि विराटनेही चाहत्यांची निराशा केली नाही. रोहित-विराटने विजयी खेळी केली. त्यानंतर आता रोहितने सोशल मीडियावर एक पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे.
विराट आणि रोहितने टीम इंडियाला अंतिम सामन्यात विजयी करुन भारताची लाज राखली. भारताने सलग 2 सामन्यांसह मालिका गमावली. त्यामुळे भारतासमोर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात क्लिन स्वीप टाळण्याचं आव्हान होतं. भारताच्या गोलंदाजांनी कांगारुंना 236 रन्सवर यशस्वीरित्या रोखलं. त्यानंतर भारताने 38.3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून विजयी धावा केल्या. भारताने यासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेची सांगता विजयाने केली.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीने भारताला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली. रोहित आणि कॅप्टन शुबमन गिल या सलामी जोडीने 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शुबमन 24 धावांवर बाद झाला.
शुबमन आऊट झाल्यांनतर विराट रोहितची साथ देण्यासाठी मैदानात आला. या जोडीनेच फटकेबाजी करत भारताला विजयापर्यंत पोहचवलं. रोहित-विराटने नाबाद 168 धावांची भागीदारी केली. रोहितने शतक तर विराटने अर्धशतक करत चाबूक खेळी केली. रोहितने नाबाद 121 धावा केल्या. तर विराटने 81 चेंडूत 74 धावांची खेळी केली. विराट आणि रोहितने सामन्यानतंर चाहत्यांचे जाहीर आभार मानले.
रोहितची पोस्ट व्हायरल
दरम्यान त्यानंतर रोहितने 26 ऑक्टोबरला भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजून 24 मिनिटांनी सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. रोहितचा हा फोटो सिडनी विमानतळावरील डिपार्चरवरील आहे. रोहितने या फोटोला “One last time, signing off from Sydney” असं कॅप्शन दिलंय. रोहितने यात निवृत्तीबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. मात्र रोहितने हा त्याचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असल्याचं स्पष्ट केलंय.