आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने होते. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणममध्ये करण्यात आलं होतं. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील सातवा आणि शेवटचाच सामना होता. इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक दिल्याने त्यांच्यासाठी हा सामना म्हणजे केवळ औपचारिकता होती. तर न्यूझीलंडला हा सामना जिंकून मोहिमेचा शेवट विजयाने करण्याची संधी होती. मात्र न्यूझीलंड जाता जाता विजयी होण्यात अपयशी ठरली. इंग्लंडने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 124 बॉलआधी आणि 8 विकेट्स राखून पूर्ण केलं. इंग्लंडने 29.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 172 धावा केल्या.
इंग्लंडचा हा या स्पर्धेतील पाचवा विजय ठरला. तर न्यूझीलंडचा हा चौथा पराभव ठरला. न्यूझीलंडच्या या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठा फटका बसला. इंग्लंडने हा सामना जिंकत साखळी फेरीत पॉइंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान पटकावलं. इंग्लंडच्या या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेची तिसर्या स्थानी घसरण झाली.
इंग्लंडला विकेटकीपर एमी जोन्स आणि टॅमी ब्युमोंट या सलामी जोडीने शानदार सुरुवात करुन दिली. या दोघींनी 75 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ब्युमोंट आऊट झाली. ब्युमोंटने 38 बॉलमध्ये 40 रन्स केल्या.
ब्युमोंटनंतर एमी जोन्स आणि हेथर नाईट या दोघींनी दुसर्या विकेटसाठी 75 बॉलमध्ये 83 रन्सची पार्टनरशीप करत इंग्लंडला विजयाजवळ आणून ठेवलं. इंग्लंडला अवघ्या काही धावा हव्या असताना हेथर 33 रन्सवर आऊट झाली.
त्यानंतर डॅनिएल व्याट-हॉज आणि एमी जोडीने इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघींनी तिसर्या विकेटसाठी नॉट आऊट 14 रन्स केल्या. डॅनिएलने 2 नाबाद धावा केल्या. तर एमी जोन्स हीने इंग्लंडच्या विजयात सर्वाधिक योगदान दिलं. एमीने 92 बॉलमध्ये 86 रन्स केल्या. एमीने या खेळीत 1 सिक्स आणि 11 फोर लगावले. न्यूझीलंडकडून कॅप्टन सोफी डीव्हाईन आणि ली ताहुहु या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला धड 40 ओव्हरही खेळता आलं नाही. इंग्लंडने न्यूझीलंडला 38.2 ओव्हरमध्ये 168 ऑलआऊट केलं. न्यूझीलंडकडून बहुतांश फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यानंतरही एकीलाही अर्धशतक करता आलं नाही. इंग्लंडकडून लिन्सी स्मिथ हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. कॅप्टन नॅट सायव्हर ब्रँट आणि एलिसा कॅप्सी या दोघींनी प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर चार्ली डीन आणि सोफी एकलेस्टोन या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.