टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि भारताला आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देणारा अजिंक्य रहाणे गेल्या अनेक वर्षांपासून कमबॅकच्या प्रतिक्षेत आहे. अजिंक्य फक्त टेस्ट या एकमेव फॉर्मेटमध्ये खेळतो. मात्र त्यानंतरही निवड समितीने त्याला संधी देण्याचा साधा विचारही केलेला नाही. सध्या अजिंक्य रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळतोय. अजिंक्यने या स्पर्धेतील छत्तीसगड विरूद्धच्या सामन्यात खणखणीत शतक करत कमबॅकसाठी दावा ठोकला आहे. तसेच अजिंक्यने या खेळीनंतर त्याच्या मनात असलेलं सर्व बोलून दाखवलं.
अजिंक्यने केलेल्या खेळीमुळे मुंबईला 400 पार मजल मारता आली. मुबंईने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 विकेट्स गमावून 406 धावा केल्या आहेत. अजिंक्यने या 406 धावांत सर्वाधिक योगदान दिलं. अजिंक्यने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 42 वं शतक झळकावलं.
मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. मुंबईने 38 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. त्यानंतर रहाणेने नेहणीप्रमाणे आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत मुंबईला सावरलं. अजिंक्यने 303 बॉलमध्ये 159 रन्स केल्या. अजिंक्यच्या खेळात 21 चौकारांचा समावेश होता. अजिंक्यने या खेळीनंतर गेल्या अनेक महिन्यांपासून मनात असलेली खदखद व्यक्त केली. तसेच टीम इंडियातील कमबॅकबाबत भाष्य केलं.
“मी किती चांगला खेळाडू आहे हे मला माहित आहे. मी बाहेर काय चाललंय हे ऐकत नाही. मला वैयक्तिकरित्या जाणवतं की टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती. तुमचा अनुभव महत्त्वाचा आहे. वय हा एक आकडा आहे”, असं अजिंक्यने म्हटलं. टीम इंडियाला गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिज गमवावी लागली होती. तसेच अजिंक्यने रोहित आणि विराट यांच्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील कामगिरीबाबतही प्रतिक्रिया दिली.
“रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी फार आनंदी आहे. रोहित आणि विराटच्या बॅटिंगवरुन अनुभव किती महत्त्वाचा असतो हे सिद्ध होतं. तसेच वय हा एक आकडा आहे”, असंही अजिंक्यने नमूद केलं. अजिंक्यने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस अजिंक्यने ही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान अजिंक्य टेस्ट टीममधून गेल्या 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून बाहेर आहे. अजिंक्यने टीम इंडियासाठी अखेरचा कसोटी सामना हा जुलै 2023 मध्ये खेळला होता. त्यानंतर आता अजिंक्य कमबॅकच्या प्रतिक्षेत आहे. टीम इंडिया नोव्हेंबर महिन्यात मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत अजिंक्यला संधी मिळणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.