-rat२६p९.jpg-
P२५O००५६३
नांदेड ः माहूर येथे आयोजित पर्यावरण संमेलनात मार्गदर्शन करताना धीरज वाटेकर.
----
सह्याद्रीला ओरबाडणे थांबवायला हवे
धीरज वाटेकर ः माहूर येथे पर्यावरण संमेलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः सह्याद्री जगातील सर्वात वयोवृद्ध डोंगररांगांमधील एक आहे. सह्याद्रीला संवर्धनासाठी आपल्या कुबड्यांची गरज नाही. सह्याद्री अवाढव्य, दयाळु, दाता आहे. त्याच्या अंगाखांद्यावर आपण आणि आपले पूर्वज हजारो वर्षांपासून खेळले, बागडले, नांदले, विस्तारले. सह्याद्रीने आपल्या शेकडो पिढ्यांना सांभाळले आहे. त्याला ओरबाडणे आपण थांबवायला हवे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्यावतीने श्री क्षेत्र माहूर येथील श्रीजगदंबा धर्मशाळा परिसरात आयोजित नवव्या पर्यावरण संमेलनात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन संमेलन अध्यक्ष पद्मश्री मा. शब्बीर (मामू) सय्यद (बीड) यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अभिजित जगताप, वन खात्याचे अधिकारी चव्हाण, स्वागताध्यक्ष उद्योजक गोपाळसिंह चौहान, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, वरीष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक, नांदेड जिल्हाध्यक्ष सारनाथ लोणे, राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कऱ्हाळे, निर्मला म्हस्के, छाया राजपूत आदी उपस्थित होते. याप्रसंगी वाटेकर म्हणाले, पर्यावरण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मुख्य काम या चळवळीशी लोकांना जोडणे हे आहे. पर्यावरण अभ्यासक-संशोधकांची संशोधने आणि कार्य जास्तीत जास्त समाजमानसापर्यंत पोहोचवून त्यांचा पर्यावरण चळवळीला पाठिंबा उभा करण्याचे काम आहे. राज्यभरातील पर्यावरणप्रेमी शिक्षक हे आपल्या मंडळाचे मुख्य घटक आहेत. आज काम करणारे हात कमी आहेत, म्हणून पर्यावरण विषयात काहीतरी करू पाहणाऱ्या हातांना प्रोत्साहन द्यायला हवे.