एलटीटी परिसरात अनधिकृत फेरीवाले
चेंबूर, ता. २७ (बातमीदार) ः लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस हे महत्त्वाचे रेल्वे टर्मिनस म्हणून ओळ्खले जाते. या टर्मिनसवरून देशभरात रेल्वे सुटत असल्याने दिवस-रात्र प्रवाशांची गर्दी दिसून येते. दरम्यान, या परिसरात ना-फेरीवाला क्षेत्र असतानाही सर्वदयो बुद्ध विहार मार्गापर्यंत येथे फेरिवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यातच रिक्षा व टॅक्सी रस्त्याच्या मधोमध उभ्या करण्यात येत असल्याने या टर्मिनसकडे जाताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
टर्मिनस परिसर ते सर्वोदय बुद्ध विहार मार्ग व प्रतीक्षा चौकापर्यंत फेरिवाले हातगाडीवर सर्रासपणे खाण्याचे पदार्थ पहाटेपर्यंत विकत असतात. हे फेरीवाले बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडरचा वापर करतात. त्यामुळे एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल प्रवाशांकडून करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासन व पालिकेने या एकत्रित मिळून टर्मिनस परिसरात असलेल्या बेकायदेशीर फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश यावेत. रेल्वे परिसरात सीसीटीव्ही लावण्यात यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.