राज्यासह संपूर्ण देशात गेल्या काही दिवसांपासून बोगस मतदारांची चर्चा सुरू आहे. अशातच आज मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक उपस्थित आहेत. यावेळी मतदार याद्यांमधील घोळ समोर आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?आपल्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आपल्याकडे म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. लोकशाहीत काय झालं यथा प्रजा तथा राजा. लोकशाहीत मतदार सरकार निवडतात. आताची परिस्थिती अशी आहे की सरकार मतदार निवडत आहेत. सरकार ठरवतंय कुणी मतदान करायचं, कुणी नाही करायचं. उडवा उडवी सुरू आहे. बोगस प्रकार सुरू आहे. म्हणून मी उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुखांना बोलावलं. एका यादीत 1200 नावं आहेत. घरं किती झाली. तर चार ते पाच जणांचं कुटुंब धरलं तर 300 घरे होतील.
पदाधिकाऱ्यांना आदेशपदाधिकाऱ्यांना आदेश देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आपण गट प्रमुखांची टीम घेऊन 300 घरांचं कंट्रोल करू शकतो की नाही? यादी घेऊन प्रत्येक घरात ती माणसं राहतात की नाही ते चेक करा. हे आजपासून सुरू करा. आज शाखा प्रमुख, उपशाखाप्रमुख, विभागप्रमुख उपविभागप्रमुखांनी भेटून यादी चेक करा. किती नावं सापडली, किती बोगस आहे. ते पाहा. चेहऱ्यानिशी मतदार आहेत की नाही ते पाहा.’
भाजपवर टीकापुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी, ‘निवडणुकीच्या दिवशी मतदार यादी फोटोनिशी पोलींग एजंटच्या हातात पाहिजे. चेहऱ्याने ओळखणाऱ्यालाच पोलींग एजंट नेमा. बोगस मतदार आढळला. मतदान करायला आला तर बेलाशक तुडवा. निवडणूक आयोग ऐकत नसेल तर बोगस मतदाराला मतदान करू देऊ नका. भाजपवाले भुरटे चोर आहेत. मोदींचं जुनं भाषण आहे. त्यांनी मुंबईचा संबंध गुजरातशी जोडला आहे. मोदींना मुंबई गिळायची आहे. हा डाव नव्याने नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आहे अशी टीकाही भाजपवर केली आहे.