Kolhapur Sugar Season: काेल्हापूर जिल्ह्यातील साखर हंगामावर 'अवकाळी'चे 'पाणी'; हंगाम लांबण्याची भीती; मोळी टाकली, उसाची प्रतीक्षाच
esakal October 28, 2025 09:45 AM

कोल्हापूर: साखर हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली असून या पावसामुळे साखर हंगाम किमान पंधरा दिवस लांबण्याची भीती व्यक्त होत आहे. दसरा, दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी मोळी टाकून प्रारंभ केला, पण आता प्रत्यक्ष गाळपासाठी उसाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.

Dhanaji Chudmunge: पहिली उचल चार हजार घेणारच: धनाजी चुडमुंगे; शिरोळमध्ये ‘आंदोलन अंकुश’ची एल्गार परिषद

महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, मात्र तत्पूर्वीच २० तारखेपासून कर्नाटकचा हंगाम सुरू झाला. कर्नाटकच्या हंगामाचा कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातील कारखान्यांना फटका बसण्याची शक्यता असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोल्हापूरसह सांगलीत अवकळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज तर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात तुफान पाऊस झाला.

याआधी झालेल्या पावसामुळे ऊसपिकांत अद्यापही पाणी साचून आहे, तोपर्यंत गेल्या दोन दिवसांपासूनच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे साखर कारखाने सुरू झाले असले तरी ऊस तोडणे अशक्य आहे. किमान आणखी पंधरा दिवस पावसाने विश्रांती घेऊन कडक ऊन पडले तरच ऊस तोडीला घात येण्याची शक्यता आहे, मात्र सद्यःस्थितीत तसे वातावरण नसल्याने कारखानदारही हवालदिल झाले आहेत.

या वर्षीच्या गळीत हंगामात पहिली उचल प्रतिटन ३७५० रुपये देण्याची मागणी ‘स्वाभिमानी’ने केली आहे. त्यावरून आंदोलन झाल्यास पुन्हा हंगाम लांबण्याची भीती होती, त्यात आता पावसाचा अडसर आला आहे. रस्त्याकडील ऊस तोडायला प्राधान्य द्यायचे म्हटले, तरी त्या उसातही पाणी असणार आहे. जादा पावसामुळे आधीच ऊस पिकाचे वजन घटले आहे, त्यात पाणी अद्याप साचून राहिल्याने त्यात घट आणखी होण्याची भीती आहे. परिणामी यंदाचा ऊस गळीत हंगाम कसोटीचा असणार आहे.

काही कारखान्यांच्या टोळ्या कार्यक्षेत्रात दाखल झाल्या. काही कारखान्यांनी ऊसतोडीचे नियोजनही दिले आहे. त्यानुसार ऊस तोडण्याची तयारी सुरू असताना अवकाळी पावसाने या सर्व नियोजनांवरही पाणी फिरवले आहे.

Kolhapur News: 'जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी गर्दी'; दीड लाख भाविक दाखल; मंदिर शिखरावर गुलाल खोबऱ्याची उधळण खर्चाचा बोजा वाढणार

आधीच काही कारखान्यांतील कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. व्यावसायिकांची देणी बाकी आहेत. त्यात चालू गळीत हंगामासाठी नव्याने कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागणार आहे. टोळ्या आल्या आहेत, पण ऊसतोड बंद असल्याने त्यांना खावटीसाठी काही रक्कम द्यावी लागणार आहे. अशा विचित्र कात्रीत कारखानदार आहेत, त्यातून कारखान्यांवर खर्चाचा बोजा वाढण्याची भीती आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.