आडूळ - अतिवृष्टीने पिकांचे झालेले मोठे नुकसान, नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळुन आडूळ (ता. पैठण ) येथील ४७ वर्षीय एका अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वत:च्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन जीवन संपविल्याची घटना सोमवारी (ता. २७) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. मयत शेतकऱ्याचे बाबासाहेब भानुदास जंगले असे नाव आहे.
बाबासाहेब जंगले यांची आडूळ बु. शिवारात गट क्रमांक २५५ मध्ये १ एकर शेती असुन ते शेतीसह मोलमजुरी करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीत होते. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे अतोनात मोठे नुकसान झाले.
शेतीत झालेला खर्च सुद्धा शेतीच्या उत्पन्नातुन निघाला नसल्याने त्यांच्यावर बँकेचे व मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा मोठा डोंगर वाढतच गेल्याने ते मागील काही दिवसांपासून सतत चिंताग्रस्त राहत होते. सध्यस्थितीत अतिवृष्टीने शेतातील पिकाचे नुकसान झाल्यानंतर हवालदिल झालेल्या या शेतकऱ्याने सोमवारी दुपारी टोकाची भुमिका घेवुन त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या घरात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.
लवकर त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नसल्याने आजूबाजूच्या रहिवाश्यांनी आतमध्ये डोकावून पाहिले असता त्यांना जंगले या शेतकऱ्याचे प्रेत लटकलेले अवस्थेत आढळुन आले. आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई असा परिवार आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असुन सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंग दुल्हत पुढील तपास करित आहे.