सोलापूर: सोलापूरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर उत्तर व मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत सोमवारी मोठा ‘राडा’ झाला. संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांना ‘गद्दारांवर कारवाई कधी करणार?’ असा थेट जाब विचारत संतप्त शिवसैनिक धावून गेल्याने एकच खळबळ उडाली. ‘कारवाई करणार नसाल, तर पक्षाचे कामकाज बंद ठेवू’, असा निर्वाणीचा इशाराही शिवसैनिकांनी यावेळी दिला.
Female Doctor Case: पोलिसांचा तपास योग्य दिशेने : रूपाली चाकणकर; फलटण उपजिल्हा रुग्णालयात घटनेची चौकशीसंपर्कप्रमुख कोकीळ यांनी या विषयावर आपण वेगळी बैठक घेऊ, असे सांगूनही शिवसैनिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. संतापलेल्या शिवसैनिकांनी कोकीळ यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत ‘कारवाई करा, नाहीतर संपर्कप्रमुख हटाव’ असा थेट नाराच दिला.
माजी खासदार खैरे यांच्यासमोरच गोंधळही बैठक पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख अजय दासरी, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर आणि प्रताप चव्हाण, महिला आघाडीच्या शहर संघटिका अमिता जगदाळे यांच्या उपस्थितीत सुरू होती. शिवसैनिकांनी अचानक थेट संपर्कप्रमुखांनाच लक्ष्य केल्यामुळे गोंधळ उडाला. निष्ठावंत शिवसैनिकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सोलापूरच्या ठाकरे गटातील अंतर्गत राजकारण मात्र ढवळून निघाले आहे.
बैठकीत नेमके घडले काय?गद्दारांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई होण्यास विलंब होत असल्याचा संताप शिवसैनिकांच्या मनात आधीपासूनच होता. त्यातच संपर्कप्रमुख अनिल कोकीळ हे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या विरोधात गद्दारांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल आणि तक्रारींबद्दल कोणतीही दखल घेत नाहीत, अशी भावना शिवसैनिकांमध्ये पसरली होती. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी संपर्कप्रमुख कोकीळ यांना घेरत पक्षविरोधी काम करणाऱ्या गद्दारांवर कारवाई करण्याबाबत चालढकल नेहमीच होते. पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून शिवसैनिक शांत राहतात. नेते मात्र मुंबईला निघून गेल्यानंतर सर्व काही विसरतात असा, थेट आरोप शिवसैनिकांनी केला.
‘त्या’ नेत्याची विश्रामगृहात संपर्कप्रमुखांची भेटआढावा बैठकीत गद्दार म्हणून आरोप झालेल्या माजी जिल्हाप्रमुख नेत्याने रात्री उशिरा शासकीय विश्रामगृहावर संपर्कप्रमुखांची भेट घेतली. या भेटीत त्याने नेत्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी शिवसैनिकांची मागणी होती. कोणताही गोंधळ झाला नाही. उलट पक्षात चांगले काम करणाऱ्यांचा व माझाही सत्कार यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. त्यांनतर महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
- अजय दासरी, जिल्हाप्रमुख
Sharad Pawar: शरद पवारांच्या बैठकीला तीन आमदारांची दांडी; आगामी निवडणुका सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून लढणारपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काही शिवसैनिकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. पक्षाची ही घरगुती बाब आहे.
- चंद्रकांत खैरे, माजी खासदार