Education News: आठ हजार शाळांत शून्य विद्यार्थी देशाच्या विविध राज्यांतील स्थिती; पश्चिम बंगाल अव्वलस्थानी
esakal October 28, 2025 09:45 AM

नवी दिल्ली : देशभरात अंदाजे ८,००० सरकारी शाळांमध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रादरम्यान एकही विद्यार्थी दाखल झाला नाही, असे अधिकृत आकडेवारीत समोर आले आहे. यापैकी सर्वांत जास्त शाळा पश्चिम बंगालमध्ये असून, त्यानंतर तेलंगणाचा क्रमांक लागतो.

शून्य विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळांमध्ये एकूण २०,८१७ शिक्षक कार्यरत आहेत. पश्चिम बंगालमध्ये अशा शाळांमध्ये १७,९६५ शिक्षक असून, शाळांची संख्या ३,८१२ आहे. शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील ७,९९३ सरकारी शाळांमध्ये एकही विद्यार्थी दाखल झाला नाही.

गेल्या वर्षी १२,९५४ शाळांमध्ये शून्य विद्यार्थीसंख्या होती. आता या आकडेवारीमध्ये काहीसा बदल दिसतो. दुसरीकडे, हरियाना, महाराष्ट्र, गोवा, आसाम, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये अशी एकही शाळा नाही. ‘‘शालेय शिक्षण हा राज्यांचा विषय आहे, एकही विद्यार्थी नसलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी येण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.

संबंधित राज्यातील शालेय शिक्षण विभागाने याबाबत अधिक ठोस पावले आणि कृती कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. काही राज्यांनी संसाधने नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असून, इमारत आणि कर्मचारी यांच्या वापरासाठी काही शाळांचे समायोजन करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे,’’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ला सांगितले.

Dada Bhuse : दादा भुसेंचा मोठा निर्णय: शासकीय शाळांनंतर आता खासगी अनुदानित शाळांमधील समित्याही एकत्र

पुद्दुचेरी, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, दमण आणि दीव आणि चंडीगड येथेही शून्य विद्यार्थी संख्येच्या शाळा नाहीत, असे आकडेवारीवरून दिसून येते. शून्य विद्यार्थी संख्येत तेलंगणा (२,२४५) दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर मध्य प्रदेशचा (४६३) क्रमांक लागतो. तेलंगणात या शाळांमध्ये १,०१६ शिक्षक कार्यरत आहेत, तर मध्य प्रदेशात २२३ शिक्षक आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ८१ शाळा आहेत. उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण परिषदेने (यूपी बोर्ड) राज्यातील बोर्डाशी संलग्न असलेल्या अशा शाळांची मान्यता रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे. यापैकी काही शाळांमध्ये गेल्या तीन शैक्षणिक वर्षांपासून एकही विद्यार्थी दाखल झालेला नाही.

एकल शिक्षकांच्या शाळा

देशभरातील एक लाखाहून अधिक शाळांमध्ये एकच शिक्षक असून, अशा शाळांमध्ये ३३ लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. आंध्र प्रदेशात अशा शाळांची संख्या सर्वात जास्त आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि लक्षद्वीप यांचा क्रमांक लागतो. मात्र, एकल शिक्षकाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यांचा क्रमांक लागतो. एकल शिक्षकाच्या शाळांची संख्या २०२२-२३ मधील १,१८,१९० वरून २०२३-२४ मध्ये १,१०,९७१ पर्यंत खाली आली आहे. ही घट सहा टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.