वाल्हे, ता.२८ : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील सदोष कामामुळे सोमवारी (ता. २७) मध्यरात्री पिसुर्टी (ता.पुरंदर) येथे अपघात झाला. वाल्ह्याहून निरेकडे जाणारी प्रवासी बस रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेल्या सिमेंटच्या दुभाजकाला धडकली. यात बसचे मोठे नुकसान झाले. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा उघडकीस आल्या आहेत. यामुळे ठेकेदाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. पिसुर्टीतील चौकात दिशादर्शक फलक, विजेची व्यवस्था व सिमेंट ब्लॉक बाजूला केले नाहीत तर पुन्हा अपघात होणार आहे. वाल्हे ते पिसुर्टी या दरम्यान चालू असलेल्या रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी सदोष कामे झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. महामार्गावर दिशादर्शक फलक, वेग मर्यादा सूचक चिन्हे वा रात्रीच्या प्रकाशाची व्यवस्था नाही.
रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेल्या सिमेंटच्या दुभाजकांचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात होत आहेत.
दरम्यान, स्थानिक रहिवासी खंडू बरकडे यांनी सांगितले की, या पिसुर्टी येथे ठिकाणी दिवसाआड अपघात होत आहेत. संबंधित ठेकेदार कंपनीने योग्य ते सूचना फलक आणि रात्रीच्या प्रकाशव्यवस्थेची तातडीने व्यवस्था करावी. तसेच सिमेंटचे ब्लॉक्स रस्त्याच्या मध्यभागी कोणतीही चिन्हे न देता ठेवले असल्याने चालकांचा अंदाज चुकतो आणि अपघात होतात. संबंधित ठेकेदार कंपनीने तातडीने फलक, रिफ्लेक्टर आणि योग्य प्रकाशव्यवस्था करणे गरजेचे आहे.अपघाताची ठेकेदार कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही.
05597