शेजारधर्माला पैशांवरून गालबोट
कुंडेवहाळ गावातील महिलेची हत्या, आरोपी जेरबंद
पनवेल, ता. २८ (वार्ताहर) : पनवेलमधील कुंडेवहाळ परिसरात राहणाऱ्या संगीता म्हात्रे (५५) यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना शेजारी राहणाऱ्या मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारीला (२३) अटक केली.
कुंडेवहाळ गावात राहणाऱ्या संगीता म्हात्रे शनिवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांचा गळा आवळून हत्या केल्याचे तसेच अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. परिसरात सीसीटीव्ही तसेच प्रत्यक्षदर्शी नसल्याने मारेकऱ्याला शोधणे आव्हान होते. या पथकाने तांत्रिक तपास आणि सखोल माहिती संकलनाद्वारे शोध घेऊन आरोपीला अटक केली आहे.
----------------------------
रागाच्या भरात कृत्य
पनवेल शहर पोलिसांच्या महिला तपास पथकाने महत्त्वाची भूमिका निभावली. या पथकाने ३० जणांची विचारपूस केल्यानंतर समीर अन्सारीकडे तपासाची सूत्रे वळाली. सखोल चौकशीत त्यानेच संगीता म्हात्रे यांची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. अन्सारीने संगीता म्हात्रे यांना ४० हजार रुपये उसने दिले होते. परंतु त्या पैसे परत देत नसल्याने २४ ऑक्टोबरच्या रात्री आरोपी त्यांच्या घरी गेला. या वेळी पैशाच्या वादातून रागाच्या भरात त्याने संगीता म्हात्रेंचा गळा आवळून हत्या केली. तसेच दागिने घेऊन पसार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
-----------------------------------
महिला पथकाची चोख कामगिरी
पनवेल विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष महिला तपास पथकाची नेमणूक करण्यात आली होती. यात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रज्ञा मुंढे, सारिका झांजुर्णे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलिस उपनिरीक्षक विनोद लभडे, हजरत पठाण, प्रियांका शिंदे, पोलिस हवालदार ज्योती दुधाणे, देवांगी म्हात्रे, महिला पोलिस शिपाई अर्चना देसाई, साधना पवार, ज्योती कहांडळ, सुप्रिया ढोमे, सुशीला सवार, तेजश्री काशीद, स्वाती पाचुपते यांचा समावेश होता.