बिबट्यांच्या हल्ल्यात २५ कोंबड्यांची पिल्ले ठार
वाल्हे, ता.२८ : मांडकी (ता. पुरंदर) येथील हरणी-मांडकी रोडवरील धुमाळशेत परिसरातील सोमवारी (ता. २७) रात्री पोल्ट्री फार्मवर दोन बिबट्यांनी हल्ला चढवला व जवळपास २५ कोंबड्यांची पिल्ले ठार केली. या हल्ल्याचे दृश्य पोल्ट्री परिसरातील सीसीटिव्हीत कैद झाले आहे. बिबट्यांमुळे महेंद्र साळुंके व अथर्व साळुंके यांचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. धुमाळशेत परिसरात उंचावर पोल्ट्री बांधलेली आहे. बिबट्याने रात्री खालील बाजूने आत शिरण्याचा प्रयत्न केला. पोल्ट्रीभोवती मजबूत जाळी असल्याने त्याला आत प्रवेश करता आला नाही, मात्र जाळीच्या छिद्रातून त्याने पिल्लांची डोकी तोडली. जाळी लहान असल्याने बिबट्यांना पिल्ले ओढून बाहेर काढता नाहीत. महेंद्र साळुंके यांना मंगळवारी (ता. २८) पोल्ट्रीच्या जाळीखालील स्वच्छता करताना जवळपास पंचवीस पिल्ले मृतावस्थेत आढळली. त्यावेळी त्यांना बिबट्याचा हल्ला झाल्याचे निदर्शनास आले. तद्नंतर त्यांनी सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता बिबटे पोल्ट्रीभोवती फिरताना दिसला. मजबूत जाळीमुळे मोठा अनर्थ टळला, असे साळुंके यांनी सांगितले.
घटनेनंतर साळुंखे यांनी तातडीने वनविभागाच्या वनपाल दीपाली शिंदे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वनमजूर हनुमंत पवार व प्रेम दाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मांडकीचे पोलिस पाटील श्रीतेज जगताप यांनी पोल्ट्रीला भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक-दोन नव्हे तर तब्बल चार बिबटे कॅमेऱ्यात दिसल्याचे महेंद्र साळुंके यांनी सांगितले. घटनेबाबत वनविभागाचे सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
05599