ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा अखेर पावसामुळे रद्द करावा लागला आहे. उभयसंघातील पहिला सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला होता. पावसाने काही षटकांनंतर एन्ट्री घेतल्याने सामना 18 ओव्हरचा करण्यात आला. त्यानंतर खेळाला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पावसाने दुसऱ्यांदा एन्ट्री घेतली. त्यामुळे पुन्हा खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची खेळाला पुन्हा केव्हा सुरुवात होते? याची प्रतिक्षा होती. मात्र बराच वेळ वाया गेल्यानंतर सामना रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली.
भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी टॉस झाला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. पहिल्या डावात 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. पावसामुळे जवळपास 40 मिनिटांपेक्षा अधिक वेळ वाया गेला. त्यानंतर दुपारी 3 वाजता खेळाला (18 ओव्हर) पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर 28 बॉलनंतर पावसाने कमबॅक केलं. भारताने 9.4 ओव्हरमध्ये 97 धावा केल्या होत्या. तेव्हा पावासाची सुरुवात झाली. पावसामुळे पहिला डाव संपवण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाला डीएलएसनुसार 5 ओव्हरमध्ये 71 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. मात्र पावसाच्या विघ्नामुळे खेळ झाला नाही. त्यामुळे सामना रद्द करावा लागला.