- rat२८p८.jpg-
२५O००९२७
मंडणगड ः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी विभागप्रमुख प्रा. संजयकुमार इंगोले.
सर्वत्र मराठीचा वापर वाढवला पाहिजे
प्रा. इंगोले ः मुंडे महाविद्यालयात मराठी भाषा सप्ताह
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २८ ः कोणत्याही भाषेचे भवितव्य त्या भाषेचा प्रत्यक्ष व्यवहारातील वापर, संशोधन, ग्रंथनिर्मिती व त्या भाषिकांचा स्वभाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर अवलंबून आहे. सध्या मराठी भाषकांनी सर्व क्षेत्रात मराठीचा वापर वाढवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. संजयकुमार इंगोले यांनी केले.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, संगणक, मोबाइलसारख्या साधनांमध्ये मराठीचा वापर सहजशक्य असून, अज्ञान किंवा आळसामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तांत्रिक क्षेत्रात मराठीचा वापर वाढला तर मराठी ही माहिती आणि ज्ञानाची भाषा बनेल. इतर भाषांचा द्वेष न करता आपल्या भाषेचा आग्रह धरला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तर डॉ. विष्णू जायभाये म्हणाले, जगातील प्रत्येक समाज आपल्या भाषेच्या माध्यमातून स्वतःची संस्कृती टिकवतो. मराठी ही आपली अभिमानाची भाषा आहे. तिचा प्रसार, प्रचार आणि नियमित वापर आपण सर्वांनी केला पाहिजे तरच जागतिक स्तरावर मराठीला योग्य मान्यता मिळेल. या कार्यक्रमाला डॉ. अशोक साळुंखे, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. संगीता घाडगे, प्रा. महादेव वाघ व प्रा. प्राची कदम आदी उपस्थित होते. आभार प्रा. महादेव वाघ यांनी मानले.