नीरा नरसिंहपूर, ता. २८ ः नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) परिसरात अवकाळी पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवली असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. ऊसतोड मजुरांच्या राहुट्यात पावसाचे पाणी शिरल्याने चिखल झाल्याने रात्र झोपण्याऐवजी बसून काढावी लागत आहे. तसेच, शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
येथील परिसरात अवकाळी पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन चिखल व चिकचिक झाल्याने ओलावा हटण्याचे नाव घेत नाही. जनावरांच्या चारा व पाण्याचे मोठे हाल होऊ लागले असून, विविध आजार बळावण्याची शक्यता वाढली आहे.
शेतकऱ्यांची शेतातील कामे खोळंबली असून, शेतात व पिकांत पाणी साचून राहिल्याने पिके सडण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, काही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू केला असून, पावसामुळे सतत ऊसतोड चालू बंद करावी लागत आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांना कामाविना बसून राहावे लागत आहे. पण राहुट्यांमध्ये पाणी शिरल्याने राहुट्या ओल्या होऊन चिखल झाला आहे. तसेच, जळण ओले झाल्याने स्वयंपाकही करता येत नाही. त्यामुळे अति पावसामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
साखर कारखान्यांचा हंगाम अजून पूर्ण क्षमतेने जरी सुरू झाला नसला तरी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात परिसरातील गावांमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनी राहण्यासाठी मोकळ्या शेतात बांबू, प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन असणाऱ्या राहुट्या उभारल्या आहेत. मात्र, जोराचे वारे व अवकाळी पावसामुळे राहुट्यांची दुरवस्था होत आहे. चिखल व दलदलीमुळे झोपताही येत नाही. आमचे हाल ना शेतकरी, ना टोळी मालक, ना कारखाना कोणालाच कसे दिसत नाही? असा प्रश्न ऊसतोड मजुरांनी उपस्थित केला आहे.
05156