खोडद, ता. २८ : खोडद (ता. जुन्नर) येथील महात्मा फुले विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी दीपोत्सव करून दिवाळी साजरी केली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी सुमारे ५०० पणत्या प्रज्वलित केल्या होत्या.
अनेक सामाजिक संस्था व तरुण विविध सामाजिक उपक्रम राबवून दिवाळी साजरी करतात. अनेक ठिकाणी मंदिरांना विद्युत रोषणाई केली जाते. मात्र आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेने आपल्या आयुष्याला प्रकाशमान केले ते ज्ञान मंदिर अंधारात आहे, या ज्ञान मंदिराला देखील प्रकाशमान केले पाहिजे या भावनेतून विद्यालयातील १९९२ च्या दहावीच्या तुकडीमधील विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या व्हरांड्यात दीप प्रज्वलित करून शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.