ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस झाला. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन मार्शने फिल्डिंग घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. तसेच या पहिल्या सामन्याआधी भारताला मोठा झटका लागला आहे. भारताच्या युवा ऑलराउंडरला दुखापत चांगलीच महागात पडली आहे.
युवा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या 3 टी 20i सामन्यांमधून बाहेर व्हावं लागलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. दुखापतीमुळे आधीच हार्दिक पंड्या या मालिकेचा भाग नाही. त्यात आता नितीशला बाहेर व्हावं लागल्याने भारताची डोकेदुखी दुप्पटीने वाढली आहे.