वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. 30 ऑक्टोबरला भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये सामना होणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाला प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाल्याने धक्का बसला. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला तिला दुखापत झाली. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं. कारण पुढच्या सामन्यात खेळणार नाही हे स्पष्ट झालं. तिच्या जागी आता संघात आक्रमक फलंदाज शफाली वर्माची निवड झाली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी शफाली वर्माने बिगुल फुंकलं आहे. एक वर्षानंतर टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर शफाली वर्माने सांगितलं की, तिला देवाने काही तरी करण्यासाठी पाठवलं आहे आणि असे सामने तिच्यासाठी नवीन गोष्ट नाही. अशा हायप्रेशर सामन्यात यापूर्वी शफाली वर्मा खेळली आहे.
शफाली वर्माने स्पष्ट सांगितलं की, ‘हे माझ्यासाठी काही नवीन नाही आणि यापूर्वीही उपांत्य फेरीचे सामने खेळली आहे. हे सर्व मानसिकदृष्ट्या मजबूत आणि आत्मविश्वासू राहण्याबद्दल आहे.मी शांत राहीन आणि स्वतःला पाठिंबा देईन. मला 200 टक्के द्यायचे आहे.’ शफाली वर्माला अचानक संघात सहभागी होण्याबाबत कॉल आला. त्याबाबत शफाली वर्माने सांगितलं की, ‘दोन दिवसापूर्वी मी हरयाणा संघासोबत होते. तेव्हा मला कॉल आला की मला बोलवलं आहे. जेव्हा एखादा खेळाडू जखमी होतो तेव्हा ते चांगलं वाटत नाही. पण देवाने मला काहीतरी चांगलं करण्यासाठी पाठवलं आहे. माझं कुटुंब याबाबत आनंदी आहे.’
शफाली वर्माचं मागचं एक वर्ष काही खास गेलं नाही. चांगल्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी धडपड सुरु होती. त्यामुळे एक वर्ष तिला संघात स्थान मिळालं नाही. शफाली शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना 29 ऑक्टोबर 2024 रोजी खेळली होती. बरोबर एक वर्षांनी तिला संघात स्थान मिळालं आहे. शफाली वर्माने 5 कसोटी सामन्यात 567 धावा, 90 टी20 सामन्यात 2221 धावा, तर 29 वनडे सामन्यात 644 धावा केल्या आहेत. प्रतिका रावल नसल्याने आता शफालीकडून फार अपेक्षा आहेत. प्रतिका रावल चांगल्या फॉर्मात होती. स्मृती मंधानानंतर टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाजी होती. तिच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आता तिची जागा घेत शफाली वर्मा उणीव भरून काढणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.