 
            महाळुंगे पडवळ, ता. ३० : ठाकरवाडी-महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला आहे. गुरुवारी (ता. ३०) सकाळी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून कळंब येथील रोपवाटिकेत अंत्यसंस्कार केले. 
महाळुंगे पडवळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील देसावळा येथे सुभाश काळे विहिरीवरील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी विहिरीत डोकावल्यावर त्यांना बिबट्या पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक रईस मोमीन, पोलिस पाटील सविता पडवळ, बिबट शीघ्र कृती दल गावडेवाडी व ठाकरवाडीतील तरुणांनी बिबट्याने विहिरीतून जाळीच्या साहाय्याने बाहेर काढले. कळंब येथील रोपवाटिकेत शवविच्छेदन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे पाच वर्षांचा आहे. बिबट्या शिकार करताना किंवा इतर प्राण्याचा पाठलाग करताना विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला आहे. 
‘‘ठाकरवाडी परिसरात माळरान असून घाट माथा आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्याची शिव आहे. येथे बिबटे येऊ शकत नाहीत. या परिसरात उसाचे क्षेत्र नाही. बाहेरून पकडलेले बिबटे आणून रात्री या परिसरात अज्ञातस्थळी सोडले जातात. येथील परिसराची बिबट्यांना माहिती नसल्याने ते विहिरीत पडतात. त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. त्यामुळे वनविभागाने या परिसरात बिबटे सोडू नयेत, अन्यथा वनअधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल,’’ असा इशारा हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी दिला आहे.