बॉक्साईटसाठी पोखरले श्रीवर्धन
esakal October 31, 2025 05:45 AM

बॉक्साईटसाठी पोखरले श्रीवर्धन
वारेमाप उत्खन्ननाने हानी, स्थानिक प्रशासनाची डोळेझाक
समीर रिसबूड ः सकाळ वृत्तसेवा
श्रीवर्धन, ता. ३० ः केंद्र सरकारच्या परवानगीने तालुक्यातील अनेक गावांमध्ये बॉक्साईटसाठीचे उत्खनन सुरू आहे. त्यासाठी वापरलेली स्फोटके, धातूच्या तुकड्यांमुळे उडणाऱ्या धुरळ्याने श्रीवर्धन तालुक्यातील वनसंपदा, जैवविविधतेसह नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
श्रीवर्धन तालुक्यात साधारण २०१० पासून बॉक्साईटसाठी विविध कंपन्यांकडून उत्खनन सुरू आहे. या खनिजाचा वापर प्रामुख्याने ॲल्युमिनियम उत्पादन करण्यासाठी होतो. त्याचबरोबर सिमेंट, रासायनिक उद्योग तसेच स्टील उत्पादनांमध्येही मागणी असते. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे, कुरवडे, गुळधे, वांजळे, मामवली, शेखाडी, भरडोली, गडबवाडी, बापवली, मेघरे गावातमोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. त्याचे विघातक परिणाम आता जाणवू लागले आहेत. खाणकाम करताना मोठ्या प्रमाणावर जमीन साफ करावी असल्याने जमिनीची धूप झाली आहे. त्याचप्रमाणे जंगले, वनस्पती नष्ट होत असल्यामुळे वन्यजीवांचे नुकसान होत आहे.
-------------------------------------------
ग्रामस्थांनी नोंदवलेले आक्षेप
ः- औदुंबर, बेहेडा, पळस, अमालतास, वड, आवळा, बेल, शिसव अशा वनस्पतींच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. स्फोटकांमुळे जमिनीखालील पाण्याचा झऱ्यांची दिशा बदलू शकते, तर बॉक्साईट अवशेषामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
- उत्खनन होत असलेल्या डोंगराच्या काही अंतरावर वस्ती असल्याने स्फोटांमुळे उडणारा धुरळ्यामुळे ग्रामस्थांना श्वसन, डोळ्यांचे त्रास जाणवू लागले आहेत. तसेच स्फोटांमुळे भविष्यात अनेक गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढवणार आहे.
- श्रीवर्धन तालुक्यात गेली १५ वर्षे बॉक्साईट उत्खनन करणाऱ्या कंपन्यांनी संबंधित ग्रामस्थांना उपेक्षित ठेवले. खनिज उत्खननास केंद्र सरकार परवानगी देत असल्याने स्थानिक प्रशासन कारवाईबाबतीत टाळाटाळ करताना दिसत आहेत.
---------------------------------------------
दुष्परिणामांशी सामना
- गणवेशवाटपाबाबत कंपन्या उदासीन.
- आरोग्य, शैक्षणिक, पिण्याच्या पाण्याची गैरसोय.
- झाडांच्या पुनर्रोपणाकडे दुर्लक्ष.
- अरुंद रस्त्यावरून वाहतुकीमुळे अपघात.
- मोजमाप यंत्रणेचा अभाव.
-------------------------------
शेखाडी ग्रामपंचायत हद्दीत बॉक्साईट उत्खननाला विरोध आहे. उडणाऱ्या धुरळ्याने श्वसन, डोळ्यांचे विकार वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात बागायतींवरही परिणाम होईल, पाणीटंचाईची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उत्तखननाला विरोध नाही.
- बबन पाटील, सरपंच, शेखाडी ग्रामपंचायत

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.