 
            दौंड, ता. ३० : दौंड शहरात कत्तलीसाठी आणलेल्या दोन गायींची पोलिसांकडून सुटका करण्यात आली. कत्तलीसाठी गायी आणून त्यांचा छळ केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे सोमवारी (ता. २७) ही कारवाई केली. गोहत्या करणाऱ्या टोळीतील सदस्यांनी दोन गायी या खाटीक गल्लीच्या ईदगाह मैदानातील झुडपांमध्ये कत्तलीसाठी बांधल्या होत्या. गोरक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पडताळणी केली. त्यानंतर महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीअंतर्गत असणाऱ्या ११२ या क्रमांकावर संपर्क साधून गायींविषयी माहिती दिली. त्यानुसार दौंड पोलिसांचे एक पथक तेथे पोचले व त्यांनी या गायींची सुटका केली. या गायींची एका गोशाळेत रवानगी केली आहे.
दौंड पोलिस ठाण्यात अंमलदार रमेश चितारे यांच्या फिर्यादीनुसार आसिफ कासम कुरेशी व हसन ऊर्फ लड्डू हश्मी कुरेशी (दोघे रा. खाटीक गल्ली, दौंड) यांच्याविरूद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आसिफ कुरेशी व हसन कुरेशी यांच्याविरुद्ध यापूर्वीदेखील दौंड पोलिस ठाण्यात गोहत्या व गोमांस साठा करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, दुखापत करणे, दंगल करणे, आदी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.