आनंदाची बातमी! 'सोलापूर जिल्ह्यातील ९९९६ लेकी लाडक्या'; एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा मिळू लागला लाभ
esakal October 31, 2025 01:45 PM

सोलापूर: मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, कुपोषण, बालविवाह रोखणे आणि समाजात मुलगा-मुलगी समानता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘लेक लाडकी’ योजना सुरु केली. १ एप्रिल २०२३ पासून ही योजना लागू केली आहे. गरीब कुटुंबांतील मुलींना आर्थिक मदतीद्वारे सशक्त बनवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सोलापूर जिल्ह्यातील नऊ हजार ९९६ मुलींना त्याचा लाभ मिळू लागला आहे.

Chandrashekhar Bawankule: महाबळेश्वरातील शासकीय, देवस्थान जमिनींवरीलअतिक्रमण हटवा : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मंत्रालयात झाली बैठक

योजनेसाठी पात्र अर्जदारांना अंगणवाडी केंद्र किंवा जिल्हा परिषदेचा महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधून अर्ज करता येतो. स्थानिक स्तरावर सहाय्यक अधिकारी व अंगणवाडी सेविकांकडून योजनेसंदर्भातील मार्गदर्शन मिळते. ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून ती मुलींच्या सक्षमीकरणाचा एक व्यापक सामाजिक दृष्टिकोन दर्शवते. शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यात मुलींच्या शिक्षणात सातत्य, आरोग्य सुधारणा आणि सामाजिक समता यांना निश्चितच चालना मिळणार आहे.

योजनेच्या लाभासाठी रेशन कार्ड (पिवळे/केशरी), मुलींचे जन्म प्रमाणपत्र, माता-पित्याचे आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो लागतो. जिल्ह्यातील जवळपास दहा हजार कुटुंबातील मुलींना योजनेचा लाभ मिळत आहे. प्रत्येक कुटुंबातील दोन मुलींना योजनेचा लाभ मिळतो.

जन्मापासून १८ वर्षांपर्यंत १,०१,००० रुपये

जन्मावेळी : ५००० रुपये

पहिली इयत्ता प्रवेशावेळी : ६,०००

सहावी इयत्ता प्रवेशावेळी : ७,०००

अकरावी इयत्ता प्रवेशावेळी : ८,०००

१८ वषे पूर्ण झाल्यावर : ७५,०००

पात्रता निकष असे...

अर्जदार कुटुंब महाराष्ट्राचे स्थायी रहिवासी असावे.

कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आवश्यक आहे.

१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुली योजनेसाठी पात्र आहेत.

Maan-Khatav Politics: माण-खटावमध्ये राष्ट्रवादीला धक्का! नंदकुमार मोरे, बाळासाहेब सावंत यांच्यासह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करून त्यांच्या शिक्षणाची सततता सुनिश्चित करणे, कुपोषण, बालविवाह रोखणे, मुलींचे कुपोषण कमी करणे, समाजात मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव कमी करून समानता प्रस्थापित करणारी ही योजना आहे. सोलापूर जिल्ह्यातील ९९९६ मुलींना योजनेचा लाभ मिळत असून १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ घेता येतो.

- प्रसाद मिरकले, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, सोलापूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.