 
            -rat३०p२०.jpg-
P२५O०१४००
राजापूर ः नव्या पूररेषेचे शहरामध्ये करण्यात आलेले मार्किंग.
---
नवी पूररेषा शहर विकासात अडचणीची
राजापुरात फेरसर्व्हेक्षण करा ; घुमे यांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० ः पावसाळी हंगामामध्ये शहरात सातत्याने राहणाऱ्या पूरस्थितीच्या अनुषंगाने लघुपाटबंधारे विभागाने नवीन पूररेषा आखली आहे. सद्यःस्थितीत ज्या भागात पुराचे पाणी पोहोचते त्यापेक्षा कितीतरी पट उंच ठिकाणी पूररेषेचे करण्यात येत असलेले मार्किंग शहर विकासामध्ये अडचणीचे ठरत आहे. शहर आणि बाजारपेठेच्या विकासाच्या मुळावर येणारी नवी पूररेषा शहरवासियांची डोकेदुखी ठरत आहे. नवी पूररेषा शहरविकासामध्ये अडचणीची ठरणारी असून, पूररेषेचे फेरसर्व्हेक्षण करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे राजापूर तालुकाध्यक्ष मोहन घुमे यांनी खासदार नारायण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
रत्नागिरी येथील जनता दरबाराच्यावेळी खासदार राणे यांना राजापूरच्या पूररेषेबाबतचे निवेदन देण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष घुमे यांनी दिली. खासदार राणे यांनी पूररेषेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासित केल्याचेही घुमे यांनी या वेळी स्पष्ट केले. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांना दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर येऊन पुराच्या पाण्याचा शहराला वेढा पडतो. त्यामुळे शहरामध्ये पूररेषा निश्चितीचा मुद्दा चर्चेत आला. प्रशासनाने सर्व्हेक्षण करून पूररेषा निश्चित केली. २००८ मध्ये निश्चित झालेल्या पूररेषेचे फेरसर्व्हेक्षण २०२२ मध्ये झाले आणि नवीन पूररेषा निश्चित करण्यात आली आहे; मात्र त्यामध्ये ज्या भागामध्ये पुराचे पाणी पोहचत नाही त्या भागाचाही पूररेषेमध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे ही पूररेषा शहरविकासामध्ये अडचणीची ठरत आहे. जलसंपदा विभागाने निश्चित केलेली पूररेषा चुकीची वाटत असल्याचे घुमे यांनी निवेदनात म्हटले आहे. 
स्थानिकांना विश्वासात 
पूररेषेचे फेरसर्व्हेक्षण व्हावे आणि त्यासाठी स्थानिक लोक, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन लोकांच्या हरकती मागवून त्यावर विचारविनिमय होऊन पूररेषा निश्चित व्हावी, अशी मागणी घुमे यांनी केली आहे.