 
            कैद्यांनी उजळवली ठाणेकरांची दिवाळी
तीन लाख ५४ हजारांची कमाई
ठाणे शहर, ता. ३० (बातमीदार) : ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंना ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यांनी तयार केलेल्या आकाशकंदील, दिवे आणि पणत्यांनी ठाणेकरांची दिवाळी उजळून निघाली आहे. सोबतच कपडे, फर्निचर, बेकरीचे पदार्थ आदी वस्तूंची खरेदी करून ठाणेकरांनी कैद्यांच्या पुनर्वसनाला हातभारदेखील लावला आहे. दिवाळीच्या निमित्ताने कारागृह प्रशासनाने विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या वस्तूंच्या विक्रीतून अवघ्या सात दिवसांत प्रशासनाला तीन लाख ५४ हजार ९२७ रुपये मिळाले आहेत.
ठाणे मध्यवर्ती कारागृहात तीन हजारांहून अधिक कैदी बंदिस्त आहेत. त्यामध्ये न्यायाधीन कैद्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कळत-नकळत घडलेल्या गुन्ह्यांसाठी त्यांना येथे ठेवण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्यांसह किरकोळ गुन्हे दाखल असून, अनेक जण जामीन मिळून अथवा शिक्षा संपून कारागृहाबाहेर येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कारागृहाबाहेर येऊन त्यांना पुन्हा सामान्य जीवन जगता यावे, रोजगार, स्वयंरोजगार मिळून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी कारागृह प्रशासनाकडून त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. तज्ज्ञांकडून त्यांना प्रशिक्षित केले जाते. या उपक्रमान्वये विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या कैद्यांनी कारागृहात सुतार काम, वीण काम, शिवण काम, हस्तकाला आणि बेकारीचे पदार्थ तयार करण्याचे काम करून विविध वस्तू तयार केल्या जातात. दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी तयार केलेल्या वस्तू कारागृह विक्री केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यास ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. अवघ्या सात दिवसात ठाणेकरांनी ३,५४,९२७ रुपयांची खरेदी केली. रिविलिंग चेअरचा सगळ्यात जास्त खप झाला. कैद्यांनी तयार केलेल्या पणत्या आणि आकाश कंदीलांचीदेखील ठाणेकरांनी मनसोक्त खरेदी केली.
सुतार काम : खुर्च्या, टेबल, देव्हारे, चौरंग, पाट, मोबाईल स्टॅन्ड, स्टूल, कॉफी टेबल, खेळणीतल्या गाड्या
यंत्रमाग : सतरंज्या, टॉवेल, रुमाल, बेडशीट, उशी कव्हर
शिवण : शर्ट, जॅकेट, पायजमा
बेकरी : खारी, टोस्ट, नानकटाई बिस्कुट
वस्तू आणि झालेली विक्री : 
सुतार काम : २२६९४८
यंत्रमाग : ७३१२५
बेकरी पदार्थ : २७५३९
शिवण : २१७६५
दिवे, पणत्या : ३५५०
कंदील : २०००
ठाणे मध्यवर्ती कारागृहात विविध सामाजिक संस्था आणि कारागृह प्रशासनाच्या मदतीने कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. बंदी कारागृहाबाहेर गेल्यावर या प्रशिक्षणाचा उपयोग त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी होतो. अर्धवट शिक्षण झालेल्या बंद्यांना पुढील शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.
- राणी भोसले, कारागृह अधीक्षक, ठाणे
फोटो : गुन्हे करणाऱ्या हातांनी तयार केल्या सुबक वस्तू