01766
सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणाच ‘व्हेंटिलेटरवर’
सुशांत नाईक ः आरोग्यमंत्र्यांकडे प्रश्न मांडणार
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १ ः सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले असून, संपूर्ण व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आहे. त्याचा मोठा फटका गोरगरीब जनतेला सोसावा लागत आहे. पालकमंत्र्यांनी पुढील चार वर्षांत आरोग्य यंत्रणा सुधारावी, असे आव्हान देतानाच लवकरच आपण आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ठाकरे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी येथे सांगितले.
उंबर्डे येथील युवती सुंदरा शिवगण ही तरुणी आरोग्य यंत्रणेची बळी ठरली. त्यानंतर नागरिकांनी रुग्णालयात आंदोलन छेडले. याप्रकरणी एक डॉक्टरवर निलबंनाची कारवाई तर वैद्यकीय अधीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्याच अनुषंगाने शुक्रवारी सायकांळी उशिरा नाईक यांनी शिवगण कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत माजी सभापती लक्ष्मण रावराणे, सचिव गुलझार काझी, माजी जिल्हा परिषद सदस्य दिव्या पाचकुडे, ओंकार ईस्वलकर आदी उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘गेली तीस वर्षे जिल्ह्याची सत्ता राणे कुटुंबाकडे आहे. आता देखील पालकमंत्री, खासदार राणे कुटुंबाकडेच आहेत. मात्र, तीस वर्षांत राणे कुटुंब सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारू शकले नाही. पालकमंत्र्यांकडे अजून चार वर्षे आहेत. त्यांनी चार वर्षांत आरोग्य सुविधा सुधारून दाखवावी. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यासोबत संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. उंबर्डेतील युवतीचा मृत्यू खुपच दुर्दैवी आहे. मात्र, त्याला जबाबदार कोण?, हे शोधले पाहिजे. चांगली आरोग्य यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देणे हे सत्ताधाऱ्यांचे काम आहे. पालकमंत्र्यांना आम्ही खुले आव्हान करतो की, त्यांच्याकडे पुढील चार वर्षे आहेत. त्यांनी चार वर्षांत आरोग्य यंत्रणा सुधारावी.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘आरोग्य यंत्रणेत तातडीने सुधारणा करावी, यासाठी आम्ही लवकरच माजी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यानंतर देखील जर आरोग्य यंत्रणेत बदल झाले नाहीत, तर ठाकरे शिवसेनेच्या वतीने जनआंदोलन छेडू.’’