पुणे : स्वारगेट पोलिसांच्या हद्दीत गुलटेकडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकाचा बंगला व जागा बेकायदा बळकावण्याच्या उद्देशाने जेसीबीच्या साह्याने संरक्षक भिंत शुक्रवारी तोडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी कंत्राटदारासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत ज्येष्ठ नागरिक सुभाषचंद्र गोपाळराव आरोळे (वय ८०, रा. झेप बंगला, टीएमव्ही कॉलनी, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे.
स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी आरोपी देवेश जैन (वय ३६, रा. मार्केट यार्ड), कंत्राटदार संजय लक्ष्मण कुदळे (रा. दांडेकर पूल), जयेश फुलपगार (वय ५४, रा. पुणे) व अनोळखी जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सकाळी साडेअकरा वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीच्या बंगल्याची संरक्षक भिंत व लोखंडी गेट तोडले. पोलिस ठाण्याला याबाबत माहिती मिळताच गुन्हे निरीक्षक विकास भारमळ, उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
Georai Crime : धुमेगाव शिवारात दोनशे किलोची गांजाची झाडे जप्त; बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईयाबाबत उपनिरीक्षक पाटील यांनी सांगितले की, फिर्यादी आरोळे यांनी त्यांचा चार हजार चौरस फुटाच्या बंगल्याच्या विक्रीचा व्यवहार देवेश जैन यांचे वडील डॉ. रवींद्र जैन यांच्यासोबत केला आहे. तो बंगला नऊ कोटी रुपयांना विक्रीचा व्यवहार झाला असून त्याबाबत महसूल विभागाकडेही नोंद झाली आहे.
मात्र, फिर्यादी हे तीन महिन्यानंतरही तो बंगला सोडायला तयार नव्हते म्हणून देवेश जैन त्यांचे व्यवसाय पार्टनर फुलपगार यांनी कंत्राटदार कुदळे यांना हा बंगला पाडण्याचे काम दिले होते. परंतु, बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याबाबत देवेश जैन यांनीही जागा ताब्यात मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. आरोपी हे पाडलेली भिंत बांधून देणार आहेत.