मुंढवा : केशवनगरमध्ये ससाणे कॉलनीत एकाच घरात तीन बेकायदा नळजोड घेण्यात आले आहेत . या गावात पाणीपुरवठा व पथ विभागाची परवानगी न घेता रात्रीच्या वेळी नळजोड घेण्याचा सपाटा सुरू आहे. रात्रीच्या वेळी नळजोडणी देणाऱ्या प्लंबरचे फोटो काढून पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व या भागातील कनिष्ठ अभियंता यांना नागरिकांनी पाठविले होते. मात्र त्यांनी कारवाई केली नाही. तसेच हे बेकायदा नळजोड काढलेही नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत चौकशीचे आदेश द्यावेत व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
केशवनगरमध्ये मुख्य जलवाहिनीवर काही प्लंबर बेकायदा नळजोड नागरिकांना देत असल्याची माहिती थेट पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता नंदकिशोर जगताप व कनिष्ठ अभियंता शाहिदखा पठाण यांना वारंवार फोटोसह माहिती दिली. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. ससाणे कॉलनीत नुकतेच सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता तोडून बेकायदेशीरपणे नळजोडणी देताना प्लंबर आढळून आला. त्याने पाणीपुरवठा व पथ विभागाची कुठलीही परवानगी न घेता रात्रीच्या वेळी बेकायदा नळजोडणी दिली आहे. हे असंच चालू राहिल्यास बाकी नागरिकांवर अन्याय होईल. असे महिलांचे म्हणणे आहे.
अनेक बेकायदा नळ जोडण्यांमुळे नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नव्या इमारतीचे बांधकाम करण्याआधीच बेकायदा नळजोडणी घेतली जाते. सुरवातीपासून इमारतीचे पूर्ण बांधकाम पिण्याच्या पाण्याने केले जाते. मात्र याकडे पाणीपुरवठा विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Georai Crime : धुमेगाव शिवारात दोनशे किलोची गांजाची झाडे जप्त; बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईकेशवनगर परिसरात दिवसाआड कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. परंतु रात्रीच्या वेळी मुख्य जलवाहिनी वरून काही प्लंबर अगदी राजरोसपणे खड्डा खोदून बेकायदा नळजोड देतात. पाणीपुरवठा विभागातील माहिती असलेल्या कर्मचाऱ्याशिवाय अशी जोडणी घेता येणे कठीण असते. कारण कोणत्या ठिकाणाहून मुख्य लाईन गेली आहे ते दुसऱ्याला कसे माहीत असणार? म्हणजे या यंत्रणेतील कोणीतरी कर्मचारी सामील असावा. त्याचा शोध महापालिकेने घ्यावा व आमच्यावरील अन्याय दूर करावा.
-शिवाजी काकडे, स्थानिक नागरिक
केशवनगरमध्ये अनधिकृत नळजोडण्या हजारोंच्या संख्येने असल्याने त्या शोधणे महापालिकेपुढे एक आव्हान आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने अद्याप नियोजन केलेले नाही. अनधिकृत नळजोड घेऊन फुकट पाणी वापरणाऱ्या नागरिकांना पाण्याची किंमत कळत नाही. त्यांची पाण्याची टाकी भरून पाणी ओसंडून वाहत असते. अंगण धुणे, रस्त्यावर पाणी मारणे, वाहने धुणे असा पाण्याचा अपव्यय त्यांच्याकडून केला जातो. मात्र इतर महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. या जोडण्या देण्यात गुंतलेल्यांवर काय कारवाई करावी.
-रागिणी पवार, स्थानिक नागरिक
प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतो. तसे आढळल्यास दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करतो.
-शाहिदखा पठाण, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग