Mumbai Local Megablock: मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द, कारण आलं समोर; प्रवाशांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
esakal November 02, 2025 08:45 PM

मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून आठवड्याच्या प्रत्येक रविवारी सिग्नल यंत्रणा यासह इतर तांत्रिक अडचणींच्या कामासाठी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. आज रविवार (ता. २) रोजीही मुंबई लोकलच्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता हा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज वाशी येथील डी. व्हाय. पाटील स्टेडियममध्ये महिला विश्वचषकचा अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्याला क्रिकेट प्रेमींसह इतर चाहते जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेने मेगाब्लॉकरद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

बाईकची मागची सीट उंच का ठेवली जाते?

दरम्यान, याबाबत रेल्वेप्रशासन अधिकृत माहिती दिली असून त्यामध्ये महिला विश्वचषक फायनलला जाणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने (CR) रविवारी (२ नोव्हेंबर) कुर्ला ते वाशी दरम्यान हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द केला असल्याचे म्हटले आहे.

यामुळे आता रविवारच्या नियमित वेळापत्रकानुसार हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा सुरळीतपणे धावणार आहेत. तर मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक राहणार आहे. यादरम्यान, लोकलचं वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला आहे.

कसे असेल वेळापत्रक?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १० वाजून ४८ मिनिट ते दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांच्या कालावधीत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार या स्थानकांदरम्यान डाउन जलद मागविर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

Local Megablock: रेल्वेमार्गावर तब्बल ७८ दिवसांचा ब्लॉक, लोकल वाहतूक ठप्प होणार; प्रवाशांचे हाल!

तर घाटकोपर येथून सकाळी १० वाजून १९ मिनिट ते दुपारी ३ वाजून ५२ मिनिट या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान अप जलद मागविर वळवल्या जातील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.