‘ही स्वामींची इच्छा’ नाट्यप्रयोगाचे आयोजन
कल्याण, ता. २ (बातमीदार) : रक्षार्चना चॅरिटेबल ट्रस्ट आणि खर्डीकर क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ‘ही स्वामींची इच्छा’ या दोन अंकी नाटकाच्या प्रयोगाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. खर्डीकर क्लासेसचे संचालक डॉ. सुनील खर्डीकर यांनी आपले विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक तसेच समस्त स्वामी भक्तांसाठी हा नाट्यप्रयोग विनामूल्य आयोजित केला होता.
दोन तास स्वामींचा सहवास अनुभवण्यासाठी रंगमंदिरात भक्तांचा मोठा जनसागर उसळला होता. स्वामी भक्त असलेल्या आणि नसलेल्या सर्व विद्यार्थी पालकांनी हे नाटक पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती.
अनेक दिग्गज मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत हा भक्तिमय सोहळा पार पडला. या कार्यक्रमादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संकेत खर्डीकर लिखित ‘आत्मविश्वास यशाचा मार्ग’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. विविध क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्यांना ‘कार्यकुशल’ व ‘सहकार्य रत्न’ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, अहिल्यानगरचे माजी आमदार लहू कानडे, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, सिने अभिनेते सतीश नायकोडी, हेमंत नेहते आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.