Marathi Entertainment News : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित अभंग तुकाराम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमाच्या प्रोमोशनवेळी दिग्दर्शक दिग्पाल यांनी सिनेमाविषयीचे अनेक अनुभव शेअर केले.
नुकतीच त्यांनी मराठी मनोरंजनविश्व या चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी छावा सिनेमातील न पटलेल्या गोष्टी उघड केल्या. सिनेमातून वगळण्यात आलेल्या लेझीम नृत्यावर त्यांनी मत व्यक्त केलं. काय म्हणाले जाणून घेऊया.
दिग्पाल म्हणाले की,"मुळात आपण त्या काळाचं भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज ही आपली दैवत आहेत. त्यांचे मावळे सुद्धा. हे लोक ज्या काळात वावरत होते त्याला काही नियम होते. काही नियम जसे आज पाळले जातात तसे त्या काळातही आहे. छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळले नसतील का ? तर असतील कारण तो महाराष्ट्राचा मर्दानी खेळ आहे. पण तो खेळत असताना प्रसंग कुठला आहे ? त्याचं तारतम्य काय आहे ? याचा विचार केला गेला पाहिजे. जेव्हा आम्ही सिनेमा बनवतो तेव्हा आपल्याकडे दुर्दैवाने कमी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे सिनेमॅटोग्राफरची अडचण समजू शकतो. पण तुम्हाला काही नियमांचे बिंदू सापडतात त्याला काहीतरी कलात्मक गोष्टी जोडाव्या लागतात. एवढीच लिबर्टी असावी."
"मी आतापर्यंत सात सिनेमे केले. माझ्या आतापर्यंत एकही सिनेमाबद्दल आक्षेप नोंदवला गेला नाही कारण ते अत्यंत श्रद्धेने केले गेलेले सिनेमे आहेत. ते नृत्य वगळल गेलं तर माझं मत असं आहे की थोडासा इतिहासाचा अभ्यास कमी पडला का काय ? कारण त्या फिल्ममेकरबद्दल मी अत्यंत आदराने सांगू इच्छितो की सहाच महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आहे. एवढा आभाळासारखा बाप हरपला असताना कुणीही मावळ्याने असो, सरदाराने असो कुणीही कितीही आग्रह केला तरीही आपल्या त्या आकाशाएवढ्या पित्याला दैवत मानणाऱ्या राजपुत्राकडून नृत्य घडेल का ? हा लॉजिकचा भाग आहे. हा त्या फिल्ममेकरने विचार करण्याचा भाग आहे. "
"जेवढा छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा थाटात पार पडला तेवढा संभाजी महाराजांचा नाही झाला कारण तेव्हा स्वराज्याच्या आसपासची परिस्थिती. त्यावेळी स्वराज्य संक्रमणावस्थेतून जात होतं. छत्रपती शिवाजी महाराज गेलेत हे पाहून सगळे शत्रू तुटून पडले होते. त्यावेळी एवढा जाणता पुत्र त्या सोहळ्यामध्ये रमणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी तो छोट्या प्रमाणात केला. पण तो भव्य दाखवून आपण महाराजांचा कुठे अपमान करत नाही का ? हा तारतम्याचा भाग आहे." असं ते म्हणाले.
Shah Rukh Khan : शाहरुखला आजही होतो बाळासाहेबांना न भेटल्याचा पश्चाताप, या कारणाने झाला होता वाद, काय घडलेलं नेमकं?