IND-A vs SA-A: भारताने दक्षिण अफ्रिकेवर तीन गडी राखून मिळवला विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी
Tv9 Marathi November 02, 2025 08:45 PM

India A vs South Africa A, 1st unofficial Test Match: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यासाठी रविवारचा दिवस खास आहे. कारण वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. पण या सामन्यापूर्वी भारत ए संघाने दक्षिण अफ्रिका ए संघाला पराभवाची धूळ चारली. या विजयासह भारत ए संघाने वुमन्स संघाला एकप्रकारे गुड लक दिल्याचं चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. भारताने पहिला कसोटी सामना 3 गडी राखून जिंकला. या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेचं वर्चस्व होतं. मात्र ऋषभ पंतच्या नेतृत्वात दुसऱ्या डावात भारताने जोरदार कमबॅक केलं आणि दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 309 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 234 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेला 75 धावांची आघाडी मिळाली होती. दक्षिण अफ्रिकेचा दुसरा डाव 199 धावांवर आटोपला आणि विजयासाठी 275 धावांचं आव्हान मिळालं.

भारताने या धावांचा पाठलाग करताना अवघ्या 32 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. साई सुदर्शन 12, आयुष म्हात्रे 6 आणि देवदत्त पडिक्कल 5 धावा करून बाद झाले होते. रजत पाटीदारने 28 धावांची खेळी करत ऋषभ पंतसोबत 87 भागीदारी केली आणि बाद झाला. पण एका बाजूने कर्णधार ऋषभ पंत लढत राहिला. ऋषभ पंतने आयुष बदोनीसोबत 53 धावांची भागीदारी केली. तसेच 113 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 90 धावा करून बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाला विजयी धावा करेल का? असा प्रश्न होता. पण तनुष कोटियनने 30 चेंडूत 23, मानव सुथारने 56 चेंडूत नाबाद 20 आणि अंशुल कंबोजने 46 चेंडूत नाबाद 37 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

तनुष कोटियानने या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीतही योगदान दिलं. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे टीम इंडियाला विजय मिळवणं सोपं गेलं. त्याने या सामन्यात एकूण 8 विकेट घेतले. तर पहिल्या डावात 13 आणि दुसऱ्या डावात 23 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरव करण्यात आला. या व्यतिरिक्त दोन डावात अंशुल कंबोजने एकूण 4 विकेट घेतल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.