अर्धा किलोमीटर पाठलाग, कुटुंबीयांचा हाय व्होल्टेज ड्रामा अन्… इराणी टोळीचा कुख्यात चेन स्नॅचर गजाआड, पाहा CCTV
Tv9 Marathi November 02, 2025 08:45 PM

राज्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेण्याच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेल्या इराणी टोळीच्या एका कुख्यात सदस्याला अखेर अटक करण्यात आली आहे. जुल्फेकार जावेद इराणी असे या आरोपीचे नाव आहे. कल्याण परिमंडळ-३ च्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी गल्लीबोळातून थरारक पाठलाग केला. विशेष म्हणजे आरोपीला ताब्यात घेताना त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांसोबत गोंधळ घालत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी दाखवलेल्या धैर्यामुळे हा सराईत गुन्हेगार अखेर जाळ्यात अडकला.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जुल्फेकार इराणी हा मुंबईतील नेहरू नगर आणि गोवंडी पोलीस ठाणे परिसरात चेन स्नॅचिंग करायचा. तो मोस्ट वॉन्टेड आरोपी होता. त्याच्यावर राज्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर कल्याण पोलिसांना हा आरोपी कल्याणजवळील आंबिवली परिसरात असलेल्या इराणी वस्तीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे डीसीपी परिमंडळ-३ यांच्या आदेशानुसार, सपोनी विजय गायकवाड, संदीप भोईर, योगेश बुधकर, राजू लोखंडे आणि ललित शिंदे यांच्या पथकाने तातडीने कल्याण आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईची आखणी केली.

यानंतर पोलिसांनी आंबिवली येथील इराणी वस्तीत छापा टाकला. यावेळी आरोपी जुल्फेकार इराणी याला पोलिसांची चाहूल लागली. त्याने तिथून पळ काढला. तो गल्लीबोळातून तब्बल अर्धा किलोमीटर पळ काढला. मात्र, पोलिसांनीही हार न मानता फिल्मी स्टाईलने त्याचा पाठलाग केला. त्यानंतर मोठ्या शिताफीने त्याला पकडले. ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

आरोपी जुल्फेकारला ताब्यात घेत असताना त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना विरोध करत मोठा गोंधळ घातला. त्यांनी पोलिसांना अडवून आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती तणावपूर्ण बनली असतानाही पोलिसांनी आपले धैर्य कायम राखले. तसेच कुठलाही अनुचित प्रकार न घडवता या सराईत गुन्हेगाराला इराणी वसाहतीतून बाहेर काढून सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

सराईत गुन्हेगार गजाआड

कल्याण पोलिसांनी जुल्फेकार इराणीला अटक केल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जुल्फेकार इराणी हा मुंबईतील अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याने, त्याच्या चौकशीतून मुंबईतील आणखी ५ ते ६ चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कल्याण पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे सराईत गुन्हेगार पकडला गेला आहे, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.