Wani Accident: चिमुकली इनायाची मृत्यूशी झुंज संपली; वणी अपघात प्रकरण, वडिलांसह, तीन मुलींचा एकत्रित दफनविधी
esakal November 03, 2025 01:45 AM

वणी (जि. यवतमाळ) : अपघातात गंभीर जखमी झालेली इनाया शाकीर शेख (वय ५) हिला नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा निरोपही सकाळी आला.

मात्र, काही तासातच ‘ब्रेन’डेड झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे नातेवाईक चिमुकलीला घेऊन घरी आले. दफनविधीची तयारी सुरू असतानाचा ईनायाचे ’हॉर्टबीट’ सुरु असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिची मृत्यूशी झुंज सुरूच होती. मात्र, रात्री साडेसात वाजताच्या सुमारास तिची झुंज संपली अन् तिने अखेरचा श्वास घेतला.

वणी-घुग्घूस मार्गावरील भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चारही बाप-लेकींचा शुक्रवारी (ता. ३१) रात्री एकाचवेळी दफनविधी झाला. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. चार अत्यंयात्रा पाहून वातावरणात शोककळा पसरली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात हळहळ होती. शुक्रवारी सकाळी लालगुडा गावाजवळ कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रियाजुद्दीन शेख (वय ५३), त्यांच्या तीन मुली मायरा (वय १७), जोया (वय १३) व अनिबा (वय ११) यांचा जागीच मृत्यू झाला होता.

अपघातानंतर सायंकाळी वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. चारही मृतदेह भीमनगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यावेळी हळहळ आणि रडवेल्या आक्रोशाने परिसर शोकसागरात बुडाला.

कुटुंबातील आई, पत्नी निलोफर, मोठी मुलगी लायबा (वय १९), भाऊ शाकीर व इतर नातेवाइकांच्या आक्रांताने सर्वांचे डोळे पाणावले. नंतर चारही पार्थिवांची अंत्ययात्रा काढून कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला.

कुशल कारागीर म्हणून ओळख

मृतक रियाजुद्दीन शेख हे कुशल मेकॅनिक म्हणून ओळखले जात होते. ट्रकमध्ये कोणताही तांत्रिक दोष असला तरी तो सहज दूर करण्याची त्यांची हातोटी होती. मूळचे मंगरुळपीरचे असलेले रियाजुद्दीन २५ वर्षांपूर्वी वणीत स्थायिक झाले. स्वभावाने मनमिळाऊ आणि मदतीस तत्पर असलेल्या या व्यक्तीने सर्वांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांना चार मुली असून, सर्व मुली हुशार व शिकण्यात पुढे होत्या.

Premium|Sherlock Holmes: प्रिय आर्थर..! गुप्तहेरांच्या जगात शेरलॉक होम्सची जादू १३८ वर्षांनंतर आजही कायम

रियाजुद्दीन नेहमी मुलींना चांगले शिक्षण देऊन मोठे करायचे स्वप्न पाहत असत, असे लायन्स हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत गोडे यांनी सांगितले. परंतु नियतीने त्यांचे हे स्वप्न चुरगळले. आता उरलेली मोठी मुलगी लायबा व आई निलोफर यांच्यावर त्या अपूर्ण स्वप्नांची जबाबदारी येऊन पडली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.