विक्रमगड, ता. १ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यासह कोकणात अवकाळीने हाहाकार माजविला असून भातपिकाचे अतोनात नुकसान केले आहे. अद्यापही पाऊस थांबायचे नाव घेत नाही; मात्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा दावा करत कुणबी सेना आक्रमक झाली आहे. नुकसानीचा योग्य मोबदला आणि कर्जमाफी दिली नाही, तर राज्यात सुरू असलेल्या शेतकरी मोर्चात उतरण्याचा इशारा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे.
स्वातंत्र्यापासून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या चुकीची भरपाई करण्याची वेळ या सरकारवर आली आहे. मागील सहा महिन्यांपासून निसर्गाने केलेल्या कोपामुळे उभे पीक आडवे झाले आहे. याप्रकरणी बुधवारी (ता. २९) कुणबी सेनेची आपत्कालीन बैठक बोलाविण्यात आली होती. जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या आंदोलनात कुणबी सेना सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढेल, असे पाटील यांनी सांगितले.
कर्जमाफीसाठी सरकारने सतर्क राहायला पाहिजे. अनेक वेळा सरकारने अशा घोषणा केल्या; मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने वारंवार केले आहे. कोकणात भात हे एकमेव पीक आहे. गेल्या काही वर्षांपासून भातपिकाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर आहे. कुणबी सेना बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्यास शेतकरी आंदोलनाची धग कोकणातदेखील उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.