उद्धट, ता. १ : बाजारभाव घसरल्याने मागील काही दिवसांत केळीला दोन ते तीन रुपये प्रतिकिलो एवढा कमी बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे इंदापुरातील उत्पादकांना केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी हताश झाले आहेत.
काही तथाकथित व्यापारी सरकारची दिशाभूल करत केळीचा बाजारभाव सात रुपये प्रतिकिलो असा दाखवत असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना तो मिळत नाही. शेतकऱ्यांच्या पदरी केवळ प्रतिकिलोस दोन ते तीन रुपये मिळत आहेत. केळीचे घड शेतामध्येच झाडाला पिकत असल्याचे विदारक चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
ऑगस्ट महिन्यात केळीला प्रतिकिलो १८ रुपये मिळत होते. तेच आत्ता दोन ते तीन रुपयापर्यंत खाली आले आहेत. विशेष म्हणजे चांगल्या प्रतिच्या मालाला देखील योग्य भाव मिळत नसल्याने व अवकाळी पावसामुळे शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या गर्तेत सापडला आहे. यावर सरकारचे मात्र अजिबात लक्ष नाही, यामुळे शेतकऱ्यांना नाराजी पसरली आहे.
उलट शेतकऱ्याकडून दोन ते तीन रुपये केळी खरेदी करून शेवट उपभोक्त्याला मात्र ३० टे ५० रुपये प्रतिडझन या चढ्या दराने केळी खरेदी करावी लागत आहे. शासनाला या व्यापाऱ्यांकडे लक्ष द्यायला मात्र वेळ नाही.
00546