rat१p५.jpg-
२५O०१७३९
राजापूर ः बिबट्या
---
दिवटेवाडी, ओगलेवाडीत बिबट्याची दहशत
मुक्त संचाराने ग्रामस्थ भयभीत ; वनविभागाकडे बंदोबस्ताची मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः शहरातील दिवटेवाडी, ओगलेवाडी, साखळकरवाडी यांसह धोपेश्वर परिसरामध्ये काही दिवसांपासून बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सायंकाळच्यावेळी लोकवस्तीमध्ये बिनधास्तपणे फिरणाऱ्या बिबट्याने अनेकवेळा पाळीव प्राण्यांना भक्ष्य केले असून, भविष्यामध्ये माणसांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लोकवस्ती फिरून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेचे दिवटेवाडी येथील शाखाप्रमुख नवीन बागवे यांनी वनविभागाकडे केली आहे.
गेल्या वर्षभरापासून शहराच्या विविध भागांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार राहिला आहे. लोकवस्तीमध्ये दिवसाढवळ्या संचार करणारा बिबट्या यापूर्वी अनेकांनी पाहिला आहे. बिबट्याच्या या दहशतीमुळे सायंकाळच्यावेळी घरातून बाहेर पडायलाही ग्रामस्थ धजावत नाहीत. यापूर्वी बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची घटना शहरामध्ये घडली आहे. त्यातून, लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी लोकांकडून होत आहे. त्यामध्ये बिबट्याचा नेमका वावर कोणत्या भागामध्ये जास्त प्रमाणात आहे, याची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही शहराच्या काही भागामध्ये बसवण्यात आले होते; मात्र, त्या कॅमेऱ्यांमध्ये बिबट्या कैद झालेला नाही. बिबट्याने आपला मोर्चा दिवटेवाडी, ओगलेवाडी, साखळकरवाडीसह धोपेश्वर परिसराकडे वळवला असून त्याकडे बागवे यांनी वनविभागाचे लक्ष वेधले आहे.
दिवटेवाडी, ओगलेवाडी, साखळकरवाडीसह धोपेश्वर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्यावेळी सातत्याने बिबट्याचा वावर राहिला आहे. या भागातील पाळीव प्राण्यांना लक्ष्य करून बिबट्याने त्याची शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी धोपेश्वर घाटीवरील एका ग्रामस्थाच्या घरामध्ये सायंकाळच्यावेळी घुसून त्याने घरातील पाळीव कुत्र्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये कुत्रा वाचला असला तरी, त्याला किरकोळ इजा झाली आहे. या परिसरामध्ये अद्यापही बिबट्याचा संचार कायम आहे. सध्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या भविष्यामध्ये माणसांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी बागवे यांनी वनविभागाकडे केली आहे.