पिंपरी, ता. २ ः भारतीय पर्वतारोहण संस्थान आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लायबिंग असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित आयएफएससी एशिया किडस् अजिंक्यपद स्पर्धा पिंपळे सौदागर येथील महापालिकेच्या योगा उद्यानातील पीसीएमसी क्लायबिंग वॉल येथे सुरू झाली. त्यात १३ देशांतील २०० परदेशी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. मंगळवारी (ता. ४) स्पर्धेचा समारोप होईल. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आयएफएससी एशिया यांच्या मान्यतेने आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त पंकज पाटील यांच्या आधिपत्याखाली स्पर्धेचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार करून पिंपळे सौदागर येथे क्लायबिंग वॉल बांधली आहे. त्यासाठी क्लायबिंग खेळातील लीड, स्पीड, बोल्डर या तीनही आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार केला आहे.
---