चाकण, ता. २ : येथील विविध रस्त्यांवर, वाइन शॉपसमोर सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचा परवाना नसताना, तसेच गैरशिस्तीचे वर्तन केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली.
चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनानुसार, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल पाटील, पोलिस उपनिरीक्षक सचिन मोरखंडे यांनी गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांसह चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर दारू प्यायला बसणाऱ्या तब्बल वीस जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके, चाकण पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार शिवाजी चव्हाण, भैरोबा यादव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रोहिदास मोरमारे, पोलिस अंमलदार महादेव बिक्कड, महिला पोलिस अंमलदार उषा होले, सरला ताजने आदींनी केली. तसेच, विनापरवाना दारूच्या बाटल्या बाळगणाऱ्यांवरही कारवाई केली.
याबाबत चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी सांगितले की, चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर कोणीही दारू प्यायला बसू नये किंवा धिंगाणा घालू नये. अनेक जण वाइन शॉपसमोरच दारू पितात व गोंधळ घालतात. येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास करतात. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करू नये. असे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.