जिल्ह्यात घुमला विठुनामाचा गजर
esakal November 03, 2025 04:45 PM

जिल्ह्यात घुमला विठुनामाचा गजर
कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी; साजगावच्या यात्रोत्सवाला प्रारंभ
अलिबाग, ता. २ (वार्ताहर) ः कार्तिकी एकादशीनिमित्त रविवारी (ता. २) रायगड जिल्ह्यातील सुमारे २१८ विठ्ठल मंदिरांत पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात कार्तिकी एकादशी साजरी करण्यात आली.
अलिबाग शहराजवळच्या वरसोली येथील प्राचीन आंग्रेकालीन विठ्ठल-रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील व पाल्हे गावात एकादशीनिमित्त पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या खालापूर तालुक्यातील साजगावच्या श्रीविठ्ठल मंदिरातही भक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. येथील यात्रोत्सवालाही रविवारपासून सुरुवात झाली. मंदिर विश्वस्त व संयोजन समितीच्या वतीने भाविकांना दर्शनात कोणतीही असुविधा होऊ नये, याकरिता उत्तम नियोजन केले होते. प्रसादाची व्यवस्था ठेवण्यात आली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचाही ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकादशीच्या आदल्या दिवसापासून मंदिर व्यवस्थापनाने जय्यत तयारीला सुरुवात केली होती. रविवारी पहाटे मंदिरांमध्ये श्रीविठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा पुरोहितांच्या हस्ते पार पडल्यानंतर मंदिरे दर्शनासाठी भाविकांसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर दिवसभर मंदिरांसमोर भाविकांनी लांबच लांब रांगा लावून श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. श्रीविठ्ठल-रुक्मिणीला तुळस प्रिय असल्याने ठिकठिकाणच्या मंदिरांसमोर तुळशीच्या माळा विकणाऱ्यांचीही गर्दी झाल्याचे दिसून आले. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असूनही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
...............
चौकट :
जिल्ह्यातील यात्रोत्सवाचा प्रारंभ
कार्तिकी एकादशीच्या दिवशी प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या साजगाव येथील बोंबल्या विठोबाच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यानंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणी म्हणजेच आवास (श्री क्षेत्र नागेश्वर) - ४ नोव्हेंबर (एक दिवस), मापगाव (श्री क्षेत्र कनकेश्वर) - ५, ६ नोव्हेंबर (दोन दिवस), वरसोली - १५ नोव्हेंबर (पाच दिवस) व चौल-भोवाळे (दत्ताची यात्रा) - ४ डिसेंबर (पाच दिवस) अशा यात्रा भरणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.