दारूचे सेवन जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात केले जाते. मात्र काही देशांमध्ये दारूबाबत कडक नियम आहेत. अलिकडेच थायलंडमध्ये दारूबंदीचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत दारू पिणे, विकणे किंवा खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असा गुन्हा केल्यास 10 हजार बाथ (अंदाजे 26 हजार) दंड भरावा लागू शकतो. हा नियम 1972 मध्ये लागू केलेल्या नियमाला बळकटी देताना दिसत आहे. संपूर्ण देशात 8 नोव्हेंबरपासून हा नियम लागू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अल्कोहोलिक बेव्हरेज कंट्रोल अॅक्ट अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. मात्र परवाना असलेली मनोरंजन स्थळे, हॉटेल्स, विमानतळ आणि पर्यटनाचा भाग असलेल्या भागांना काही प्रमाणात सूट देण्यात आलेली आहे. तसेच या नवीन नियमांनुसार अल्कोहोलचा प्रचार किंवा जाहिरातींवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे आता सेलिब्रिटी, इन्फ्लुएंसर किंवा इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना दारूच्या प्रचारासाठी परवानगी मिळणार नाही.
काय आहे नवीन नियम?थायलंडमध्ये लागू झाल्या नवीन नियमाबाबत बोलताना रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष चॅनॉन कोएटचारोएन यांनी सांगितले की, नवीन नियमांमुळे रेस्टॉरंट्ससाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत एक उदाहरण देताना ते म्हणाले की, जर एखाद्या ग्राहकाने दुपारी 1:59 वाजता बिअर खरेदी केली आणि ती पिण्यासाठी थोडा वेळ घेतला तर ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल आणि यासाठी त्याला दंड होऊ शकतो. यामुळे विक्री कमी होऊ शकते.
थायलँडमधील बँकॉकचा खाओ सॅन रोड हा बॅकपॅकर हब आहे. या ठिकाणी असलेले बार आणि रेस्टॉरंट्स सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दारू विकतात, मात्र अनेकदा ग्राहत यानंतरही दारूची मागणी करत असतात, मात्र आता अशाप्रकारे प्रतिबंधित काळात दारूची विक्री करता येणार नाही.
विरोधी पक्षाच्या खासदारांकडून विरोधसरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला आहे. पीपल्स पार्टीचे खासदार ताओफिफोप लिमजित्राकोर्न यांनी, दारू 24 तास विकली पाहिजे असे विधान केले आहे. नवीन नियमांमुळे परदेशी पर्यटकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन करू शकतात. त्यामुळे आता थायलंडला जाणाऱ्या पर्यटकांना सावध रहावे लागणार आहे.