Sharad Pawar Ajit Pawar : कोल्हापूरनंतर आता 'या' जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी लढणार एकत्र, भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार?
esakal November 13, 2025 09:45 AM

Sangli Both NCP Allience : ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख मंडळी, कार्यकर्त्यांनी एकसंध व जिद्दीने काम करून विरोधकांना शिराळा नगरपंचायतीमधील एकही जागा जिंकता येणार नाही, असा बंदोबस्त करावा,’’ असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिराळा नगरपंचायतीसह पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवतील, हे स्पष्ट करत उलट-सुलट चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.

चिखली (ता. शिराळा) येथे भाजपला मोठा धक्का देत मानसिंगराव नाईक यांनी माजी नगरसेवक अभिजित नाईक, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती, सदस्य वैशाली नाईक, विक्रमसिंह नाईक, गायत्री नाईक यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करवून ‘घरवापसी’ घडवून आणली.

मानसिंगराव नाईक म्हणाले, ‘‘शिराळ्यात विरोधकांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. सर्व कार्यकर्त्यांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून हातात हात घालून काम केल्यास विरोधकांना एकही जागा जिंकता येणार नाही. शिवाय विधानसभा निवडणुकीत घटलेल्या मतदानाचा वचपा काढता येईल.’’

‘‘विरोधकांनी आतापर्यंत शिराळ्याच्या विकासाविषयी जनतेची दिशाभूल केली आहे. तोरणा ओढा सुशोभीकरण, किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम यासह अनेक कामांना खोडा घालण्याचे काम केले आहे,’’ असा आरोप केला. ते म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या तोंडावर कामे आणून ते शिराळ्यासाठी काहीतरी करीत असल्याचे भासवत आहेत. मी प्रत्यक्षात शिराळ्यात कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण केली आहेत. शहरात अनेक सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत. म्हणून गेली कित्येक वर्षे शिराळकरांनी प्रेम दिले आहे.’’

मानसिंगराव नाईक म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधी असताना शैक्षणिक प्रबोधन करणे या मुद्द्याखाली शिराळा नागपंचमीतील प्रत्येक मंडळातील चार कार्यकर्त्यांना नाग हाताळण्याची परवानगी आणली होती. मात्र त्यावेळी काही मंडळी व विरोधकांनी हे मान्य केले नाही. अशी प्रथा पाडल्यास तीच कायम होईल, म्हणून त्यांनी विरोध केला. आता त्याच मुद्द्याखाली मोजक्या लोकांना परवानगी मिळवून नागपंचमी उत्सवाचा राजकीय वापर केला जात आहे.’’

‘‘आमच्यापासून काही काळ बाजूला गेलेले अभिजित, वैशाली, विक्रम व गायत्री मूळ कुटुंबात व प्रवाहात आजपासून पुन्हा सहभागी झाले आहेत. त्यांच्या निर्णयामुळे निश्चितच मोठा परिणाम होणार आहे,’’ असे नाईक यांनी स्पष्ट केले. विराज नाईक म्हणाले, ‘‘नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी मानसिंगराव नाईक यांचा शब्द प्रमाण मानून काम करावे. प्रत्येक प्रभागात मोठे जनमत बाजूने असणारा उमेदवार दिला जाईल. आजच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढली असून कार्यकर्त्यांत उत्साह आला आहे.’’

Sangli Double killing Case : सांगलीत डबल मर्डरने खळबळ! दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहितेंचा वाढदिनीच खून, मारणाऱ्याचाही जागेवरच खात्मा

अमित गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अभिजित नाईक, विक्रमसिंह नाईक, वैशाली नाईक, गायत्री नाईक यांच्या प्रवेशाबद्दल माजी सभापती सम्राटसिंग नाईक, विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी सत्कार केला. यावेळी विश्वास कदम, प्रमोद नाईक, विवेक नाईक, भूषण नाईक, देवेंद्र पाटील, अजय जाधव, प्रवीण शेटे, महादेव कदम, सुनील कवठेकर आदी उपस्थित होते.

‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार’

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व आम्ही एकत्र नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मानसिंगराव नाईक यांनी त्यांच्या भाषणात दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.