वडगाव मावळ, ता. १३ : मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्या वतीने मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसाठी शनिवारी (ता. १५) मोफत रायगड दर्शन सहल आयोजित करण्यात आली आहे.
या सहलीत रायगड येथील शिवसमाधीचे दर्शन, पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन तसेच महाडच्या चवदार तळ्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन आदी स्थळांचा समावेश आहे. यावेळी रायगडावर सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते तथा दिग्दर्शक प्रवीण तरडे, संगीतकार अवधूत गांधी, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, आम्ही मावळे प्रतिष्ठानचे प्रमुख राज देशमुख, राज्याचे रोजगार हमी रोजगार मंत्री भरत गोगावले, आमदार सुनील शेळके, विकास गोगावले आदी उपस्थित राहणार आहेत.
कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या शिवाजी महासम्राट या कादंबरी मालिकेतील तिसरा खंड ‘आसमान भरारी’ या हस्तलिखिताचे मेहता प्रकाशनाचे प्रमुख अखिल मेहता या प्रकाशकाकडे हस्तांतरण सोहळा होणार आहे. जास्तीत जास्त शिक्षक बंधू-भगिनींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे अध्यक्ष बाबासाहेब औटी, संस्थापक राजू भेगडे व शिवाजी ठाकर यांनी केले आहे. रघुनाथ मोरमारे, तानाजी शिंदे, गोरक्ष जांभूळकर, अमोल चव्हाण, सुहास धस, धोंडीबा घारे, संजय ठुले, अजिनाथ शिंदे, संतोष राणे आदींनी संयोजन केले आहे.
---