बिबट्यामुळे लग्नाळु मुले टेन्शनमध्ये? 'या' भागात सोयरिक हाेईना, वर पित्यांपुढे नवीन संकट..
esakal November 13, 2025 06:45 PM

-संजय बारहाते

टाकळी हाजी: बिबट्यांच्या मानसांवरील वाढत्या हल्याने बिबटप्रवण क्षेत्रातील गावांतील मुलांच्या सोईरिक जमणेही अवघड झाल्याने वर पित्यांपुढे नवीन संकट उभ राहु पहात आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील चासकमान आणि कुकडी प्रकल्पामुळे या भागात शेतीला पाणी मिळालं, आणि गावागावात बागायत फुलले. एकेकाळी उजाड असणाऱ्या माळरानावर आता ऊस, डाळिंब, कांदा, भाजीपाला अशी समृद्ध पिकं दिसू लागली. झोपड्यांच्या जागी बंगले उभे राहिले, सायकलच्या जागी चारचाकी वाहनं उभी राहू लागली. पैसा, ऐश्वर्य, आणि शहरी झळाळी गावाकडे आली. पण या समृद्धीच्या सावलीत आता भयाने घर केले आहे. ते बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचं भय.

Leopard Attack: होत्या गाई म्हणून वाचल्या बाई ! 'टाकळी हाजी येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला'; गायीच्या प्रतिहल्ल्याने वाचला जीव..

पिंपरखेड परिसरात अलीकडे झालेल्या सलग हल्यांनी संपूर्ण परिसर हादरला आहे. निष्पाप बालकं, महिला, शेतकरी यांचा बळी गेलेला पाहून गावकरी भयभीत झाले आहेत. शेतात गेलेला माणूस संध्याकाळपर्यंत घरी परत येईल की नाही, याची खात्री राहिलेली नाही. आई संध्याकाळी आपल्या लेकराची वाट पाहतेय, पण मनात सतत एकच प्रश्न “माझं मूल सुखरूप परत येईल ना?”शिवारात काम करणं आता जीवावर आलं आहे.

कुठून बिबट्या येईल, कुठून झडप घालील, याचा थांगपत्ता नाही. गावात रात्री शांतता असते, पण त्या शांततेत भीतीचा आवाज घुमतो . “बिबट्या पुन्हा आला तर?” या भीतीने आता गावकऱ्यांच्या सामाजिक आयुष्यावरही गडद सावली टाकली आहे. तरुणांच्या लग्नाची गोष्ट निघाली की बाहेरगावचे पालक विचारतात , “तुमच्याकडे पैसा, जमीन सगळं आहे, पण आमच्या मुलीच्या सुरक्षिततेचं काय?” या प्रश्नाला गावकऱ्यांकडे उत्तर नाही. परिणामी अनेक तरुणांची सोईरीक ठरूनही अडकून पडली आहे.

Farmer Women: बिबट्याच्या भितीने नवीन ‘संरक्षण कवच’; पिंपरखेड परिसरातील शेतकरी महिलांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे, अनोख्या उपायाची चर्चा..

“शेती, घर, संसार सगळं आहे, पण आता संसार सुरू कसा करायचा? आमच्या लेकरांच्या आयुष्याचा गाडा या भीतीने थांबून गेलाय,” असं एका ग्रामस्थाचं डोळ्यात पाणी आणणारं म्हणणं आहे. या भागातील नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, पिंपरखेड परिसरासह शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या हल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावलं उचलावीत, अन्यथा ग्रामीण भागाचं जगणंच बंद होईल .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.