लोणावळा, ता. १३ : कार्ला येथे मंडलाधिकारी व तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे सुरू असलेले काम दोन वर्ष होऊनही अद्याप पूर्ण झालेले नाही. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी इमारतीच्या कामास गती देत लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत कार्ला येथील ग्रामस्थ भाऊसाहेब हुलावळे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने इमारतीचे काम सुरू आहे. अपूर्ण अवस्थेतील कार्यालयांचे बांधकाम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काम रेंगाळल्याने नवीन कार्यालयाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे या कार्यालयांची कामे येत्या तीन चार दिवसांत सुरू करून बांधकाम पूर्ण करावे. बांधकाम पूर्ण करण्याबाबत दिरंगाई झाल्यास नाइलाजास्तव लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा दिला.