बदलत्या जीवनशैलीने घात
राज्यात २८ लाख मदुमेहाचे रुग्ण, जनजागृतीची गरज
(लोगो ः जागतिक मधुमेह दिन)
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : देशासह मुंबईत मधुमेही रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेहामुळे शरीरातील अन्य अवयवांसह मूत्रपिंडाच्या कार्यावरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे बदललेली जीवनशैली घातक ठरत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात मधुमेहाचे सहा कोटींहून अधिक रुग्ण आहेत, तर मुंबईत २० टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त असून, २० ते ४० वयोगटातील लोकांचाही यात समावेश आहे. एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. राशी अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, मधुमेहाची सुरुवातीला लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे ५० टक्के लोकांना मधुमेह असल्याचे समजत नाही. अनेकदा हृदय किंवा मूत्रपिंडाच्या समस्येनंतर उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना मधुमेहाचे निदान होते. त्यामुळे जागरूकतेचा अभाव, अनियमित तपासणीमुळे ३० ते ६५ वयोगटात हा आजार झपाट्याने पसरत आहे.
-------------------------------------
गैरसमजुतीमुळे निदानास विलंब
३० वर्षे व त्यावरील वयोगटातील प्रौढ व्यक्तींची समुदाय स्तरावर मधुमेहासाठी तपासणी आशासेविकांमार्फत गावपातळीवर करण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्र/समुदाय आरोग्य केंद्र येथे इतर कारणांसाठी आलेल्या रुग्णांचा इतिहास घेणे, बीएमआय, रक्तदाब, मधुमेह तपासणी केली जाते. पण मधुमेह फक्त वयोवृद्धांचा आजार आहे, या गैरसमजुतीमुळे निदानास विलंब होतो.
--------------------------
जिल्हास्तरावरील उपाययोजना
- सीएचसी आणि जिल्हा रुग्णालय स्तरावर एनसीडी क्लिनिकची स्थापना करण्यात आली आहे.
- मधुमेहाच्या तपासणी व उपचारांसाठी ग्लुकोमीटर, स्ट्रिप्स आणि औषधांचा पुरवठा केला जातो.
- मधुमेह चाचणीसाठी अतिदुर्गम भाग तसेच शहरी झोपडपट्टी भागात आरोग्य शिबिराद्वारे चाचणी व उपचार
......................................
प्रतिबंध आवश्यक
बाल्यावस्थेपासून वृद्धत्वापर्यंत मधुमेह प्रतिबंध, तपासणी आणि उपचारावर भर देण्यात आला आहे. आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, ताणतणाव नियंत्रण, वेळेवर तपासणी मधुमेह नियंत्रणाचे मुख्य घटक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मधुमेह हा बालपण, प्रजननकाळ, कार्यक्षम प्रौढ वय आणि वृद्धत्व या सर्व टप्प्यांवर परिणाम करू शकतो. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
....................................
नियंत्रणाची गुरुकिल्ली
- रिजनल टेक्निकल हेड डॉ. उपासना गर्ग यांच्या म्हणण्यानुसार मधुमेहाच्या निदानाकरिता नियमित तपासणी हा सर्वात प्रभावी उपाय आहे. फास्टिंग ब्लड शुगर, पोस्टप्रांडियल ब्लड शुगर आणि एचबीए १ सी चाचण्या मधुमेह नियंत्रणासाठी महत्त्वाच्या आहेत.
- ३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी किंवा कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असलेल्यांनी नियमित तपासणी करावी. निरोगी आहार, दररोज व्यायाम, तणावाचे नियंत्रण, धूम्रपान टाळणे आणि पुरेशी झोप हीच मधुमेह नियंत्रणाची गुरुकिल्ली आहे.
------------------------------------
कालावधी तपासणी रुग्णसंख्या
१ जानेवारी ते ३० ऑक्टोबर तीन कोटी ७१ लाख ९२ हजार ४६२ २८ लाख ६८ हजार १३२