कल्याणचे माजी महापौर रमेश जाधव शिंदे गटात
esakal November 16, 2025 07:45 AM

कल्याणचे माजी महापौर रमेश जाधव शिंदे गटात
कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून, शिवसेना ठाकरे गटाला अवघ्या आठवड्याच्या आत आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर तसेच ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा सह संपर्कप्रमुख रमेश जाधव यांनी आपल्या अनेक समर्थकांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेनेत शिंदे गट प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा शुक्रवारी (ता. १४) रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांतील अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) दाखल होत आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील गळतीचे सत्र थांबायला तयार नाही.
काही दिवसांपूर्वीच उबाठा पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता अवघ्या आठवड्याच्या आत माजी महापौर रमेश जाधव यांनी प्रवेश केल्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाधव यांच्या प्रवेशाचे स्वागत करीत त्यांना आगामी राजकीय आणि सामाजिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकांमध्ये एकजुटीने आणि विकासाच्या ध्येयाने काम करण्याचे आवाहन केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.