>> चैताली कानिटकर, [email protected]
हिमालयाच्या कुशीत निसर्गाचे अद्भुत सौंदर्य झेलत ऐन हिवाळ्यात करता येणारा ट्रेक हा निश्चितच रोमांचक अनुभव. असा अनुभव घेण्यासाठी ब्रह्मताल ट्रेक अगदी योग्य. जादुई अनुभव देणाऱया या ट्रेकची ही सफर.
अनेक ट्रेकर्सना हिवाळ्यात ट्रेकिंग हे वेगळं थ्रील वाटतं. अशांसाठी ब्रह्मताल हा ट्रेक एक जबरदस्त ट्रेक आहे. एका पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवांनी येथील सरोवराजवळ ध्यान केले आणि हे स्थान ब्रह्मताल नावाने ओळखले जाऊ लागले. हा ट्रेक सहा दिवसांचा आहे व मध्यम पातळीतील आहे. 12300 फूट उंचीवर नेणारा हा हिवाळी ट्रेक आहे. ट्रेकला सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम ऋषिकेशला पोहोचावे लागते. दिल्ली, डेहराडून विमानतळ किंवा चंदिगढ येथून ऋषिकेशला पोहोचता येते. एक दिवस मोकळा ठेवल्यास ऋषिकेश व्यवस्थित पाहता येते.
ट्रेकचा पहिला प्रवास अर्थातच ड्राईव्हचा आहे. ऋषिकेश ते लोहाजंग हे अंतर 10 तासांचे – 250 किलोमीटर आहे. या प्रवासात गढवाल हिमालय, पवित्र गंगा नदी, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, करणप्रयाग हे संगमसुद्धा पाहायला मिळतील. लोहाजंग गावाच्या नावाभोवती एक मनोरंजक लोककथा आहे. स्थानिक लोक म्हणतात की, देवी पार्वतीचे येथे लोहासुर नावाच्या राक्षसाशी युद्ध (जंग) झाले होते आणि म्हणूनच गावाचे नाव पडले. हे गाव तसे लहान. बाजारपेठही लहान आहे.
लोहाजंग हे उंचावरचे गाव आहे. त्यामुळे थंडी पडण्याची अपेक्षा आहे. विशेषत रात्री आणि ऋतूनुसार पाऊस व धुकेदेखील असू शकते. सकाळी उठल्यावर ट्रेक सुरू होतो तो लोहाजंग ते गुजरेणी. ही वाट आपल्याला आकर्षक जंगलाच्या वाटेवरून घेऊन जाते. इथे तुरळक घरं दिसतात. इथून पुढे एक छोटासा ट्रेक केला की, मुंडोली हे गाव लागते. या प्रदेशात रोडोडेंड्रॉनच्या झाडांची गर्दी दिसते. जणू सजल्यासारखाच हा भाग दिसतो. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान इथलं दृश्य या झाडांमुळे अतिशय देखणं दिसतं तर हिवाळ्यात हा सगळा भाग बर्फाने झाकलेला असतो. एक-दीड तासाच्या ट्रेकिंगनंतर आपण गुजरेणी ओढय़ावर पोहोचतो.
इथली कॅम्पसाईट सोनेरी ओक, सिल्व्हर ओक, मॅपल आणि रोडोडेंड्रॉनच्या झाडांनी झाकलेल्या घनदाट जंगलाने वेढलेली आहे. ही कॅम्पसाईट पक्षी निरीक्षणासाठीदेखील उत्तम ठिकाण आहे. हिमालयीन वुडपेकर, एशियन बॅरेड आउलेट, ब्लू-फ्रंटेड रेडस्टार्ट आणि सोलोटरी स्निपसारख्या हिमालयीन पक्ष्यांच्या प्रजाती इथे दिसतात. कॅम्पसाईटवर पोहोचल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन घेता येते. नंतर संध्याकाळी अनेक जण ‘अक्लमटायझेशन वॉक’ करतात. रात्री छान विश्रांती घेतल्यानंतर दुसऱया दिवशी गुजरेणी ते तिलंदी असा चार-पाच तासांचा ट्रेक आहे. या वाटेवरील हिरव्यागार कुरणात पाऊल ठेवताच निसर्गाचे अतुलनीय सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. त्रिशूल आणि नंदा घुंटीच्या पर्वतरांगा जणू क्षितिजाला गवसणी घलत आहेत असा हा सारा देखावा भासतो. ही हिमालयाची भव्यता मंत्रमुग्ध करणारीच. हे विलोभनीय दृश्य डोळयात साठवून पुढच्या प्रवासाकडे आपण वळतो. ट्रेकचा हा दिवस जरी लहान असला तरी रिलॅक्स होण्यासाठी, फोटोसेशनसाठी आणि निसर्ग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी उत्तम आहे. त्यापुढील दिवस समीटचा आहे.
तिलंडी ते ब्रह्मताल हा ट्रेक जवळपास सात-आठ तासांचा आहे. ब्रह्मताल माथ्याची उंची 12,250 फूट आहे. या ठिकाणाहून विहंगम पर्वतदृश्ये दिसतात. ब्रह्मताल शिखरावरून ट्रेकच्या मुख्य आकर्षणाकडे, पवित्र अल्पाइन तलावाकडे, ब्रह्मताल तलावाकडे जाताना उतार लागतो. येथे एक लहान मंदिर दिसते, जे तिथल्या अलौकिक वातावरणात भर घालते. हिवाळ्यात ब्रह्मताल तलाव गोठतो आणि बर्फाच्छादित सृष्टीने वेढलेला एक जादुई प्रदेश होतो. त्यावेळी इथल्या तलावाचे भव्य दृश्य मंत्रमुग्ध करणारे असते.
पुढील दिवस ट्रेकिंगचा शेवटचा दिवस. ब्रह्मताल ते लोहाजंग असा हा ट्रेक ज्याचे अंतर अंदाजे 10 किलोमीटर आहे आणि ते सुमारे आठ तासांत पूर्ण करता येते. वाटेत स्थानिक लोक, मेंढपाळांच्या झोपडय़ा म्हणजे छन्नी दिसतात. सर्व परिसर मन मोहून टाकणारा आहे. पुढील दिवस ट्रेकचा अंतिम दिवस. ड्राईव्हने ऋषिकेशला परतताना निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेत आणि ट्रेकिंग प्रवासादरम्यानच्या आठवणींना उजाळा देत ट्रेक पूर्ण होतो.