बंडूचे बंड
esakal November 16, 2025 04:45 PM

गिरीश कुलकर्णी - writetogpk@gmail.com

बंडू नव्या युगाचा पाईक होता. वस्तूंनी शाकारलेलं त्याचं आयुष्य सुखासीन होतं. बसल्या जागी खाणे-पिणे होते. तरी त्याला त्रास होतच होता. आयुष्याची द्रुतलय दुःखाची समही लवकर लवकर आणत असे. बरे पारंपरिक दुःखांचे अपवाद वगळता यातील बरीच दुःखे नव्या युगाच्या डेट्याच्या रेट्यानं आलेली आणि नवनव्या ट्रेंडनी शृंगारलेली असल्याने शीतलताही (पक्षी - कूऽऽलनेस) देत असत.

साधेपणातील जगण्याची श्रीमंती, कोकणातील दिवाळी

आपल्या दुःखाची गोष्ट जाहीर करणे (पक्षी - स्टोरी टाकणे) शीतलतम समजले जात असे. रोज घरपोच आयता येऊन पडलेला नव्या डेट्याच्या कचऱ्याचा डोंगर चढून, पोखरून, ऐकून, पाहून, भोगल्याशिवाय समाजाच्या कळपात घेत नसत. एकदा जातपंचायतीनं एक गोष्ट आवडती म्हटली, की सगळ्यांनी तीस आवडती न म्हणल्यास प्रत्यवाय होत असे आणि नावडत्या गोष्टी, घटनांचा पाऊस जरी लांबला, तरी आपला देश, प्रदेश, भाषा, इतिहास आणि समाज सगळ्यात भारी असं म्हणत राहावं लागे.

एक सोय होती. नाव लपवून भल्याभल्यांना अर्वाच्य शिवीगाळ करता येत असे. साहजिकच समाजमनात व माध्यमांवर नवनवे उकिरडे माजत आणि त्यातलं सोनखत वेचून परदेशी तंत्रडोमकावळे चारा गोळा करत असत. मग त्यांच्या काकवाणीतून समाजाची नीती ठरत असे. ते ठरवत, काय शीतल (पक्षी - कूल) आणि काय उष्ण (हॉट) तर अशा काळात करता करता, दिवस जात होते आणि हाती आलेल्या वैफल्याने अनेक जीव कासावीस होत होते.

बंड्याची आई केवळ काळजी करायची. वडील फक्त चिडचिड आणि मित्र नेमाने पाणउतारा. बंड्याला कळेनासे होऊन तो रीतीप्रमाणे डिप्रेशनची ष्टोरी टाकून मानसोपचार तज्ज्ञाकडे गेला. तज्ज्ञ आणि तो यांच्यात झालेल्या अगम्य संवादानंतर तज्ज्ञाने निरनिराळे अवघड शब्द योजून रोगनिदान केलं. उपचार म्हणून काही औषधे दिली आणि ‘जर्नलिंग’ करायला सांगितलं.

बापाकडे किरकिर करून बंड्यानं घेतलेल्या नव्या फोनमध्ये त्या नावाचे एक दुर्लक्षित ॲप होते खरे. जर्नलिंग म्हणजे काय ते बंड्याने तातडीने गुगल केले. जर्नलिंग केल्याने प्रगती होते वगैरे मजकूर वाचला आणि लगेचच ॲप उघडून बुलेट जर्नलिंग (पक्षी - दैनंदिनी, डायरीचा नवयुगीन अवतार) सुरू केले.... आज तेवीस फेब्रुवारी नाही तर चोवीस जानेवारी आहे. म्हणजे व्हॅलेंटाइन डे ला किती दिवस? माझा बाप ना पुढारी ना पोलीस. त्यामुळे मला चिंधीगिरी करावी लागते. श्टेटसवाला बाप पायजे यार! पैसा भरपूरच पायजे मगच लाइफला मिनिंग मिळेल. आज सुन्नं वाटत आहे ! आजपण !

मी उगाच आर्ट्सला गेलोय. आमच्या वर्गातला पव्या परवा येरवड्यात गेला. आता तो बॅंकॉकला जाणारे म्हणे. पळून. बापानी साधं पार्किंगवर पण कधी अतिक्रमण नाही केलं. त्याच्यात डेरिंग नाही. करेज पाहिजे. बिल्डिंगमधल्या बऱ्याच अंकल-आंटींची लफडी चालू आहेत, असं चैतन्य म्हणाला. लाइफला थ्रील पायजेच.

आम्ही जुवेनाईले म्हणून कायपण सहन नाय करणार. पॅार्नवर बंदी कशाला? सगळेच तर बगतात च्यॉऊमीन एक नंबर डीशे! सगळं बेकारे! मनी हाईस्ट भारी आहे.

माजा काही दोषच नाहीये. हार्मोनला कळायला पायजे. पव्याचा जामीन होणारे हे प्रामाणिक वगैरे काही नसतं. सगळे पैसा खातात.

पुण्याचं नाव कोयतासिटी ठेवायला पायजे. केपीतल्या (पक्षी - कोरेगाव पार्क) गल्यांमदे कसले एकेक टॉमचिक बंगलो आहेत. मिलिनेअरच व्हायला पायजे. आज स्नेहलनी लाइन दिली. व्हॅलेंटाइनला कुठला गुलाब देऊ. साला सगळीकडं काश्टमुळं इज्जत जाती. काश्ट बदलूनच घेतो. तरी मी रप बोलून माजी अप्पर काश्ट लपवतो. हॅंडलपन बी१डूड असंच ठेवलंय. माजी भाशा मराठी आहे म्हणून काय इंग्लिश पिच्चरपन बगायचे नाही? टेक्नॉलॉजीबद्दल ग्रॅटिट्यूड वाटला पायजे.

ट्रंपनी मारून ठेवली सगळ्या स्कॉलरांची. मी अभ्यासात वेळ वाया घालवत नाही बसलो. अभ्यासात टाइमपास नायच केला पायजे. लाइफ एकचे एंजॉय केलं पायजे.

आई चांगलीए पण ओल्ड स्कूले. तिनी लाइफ लाइटली घेतलं पायजे. वैशालीमुळं (पक्षी - बंडूची मोठी बहीण) मी अनसक्सेसफुल वाटतो. सक्सेस पायजेच पायजे.

प्रत्येकाची श्टाईल वेगळी पायजे पन ट्रेंडला पन लक्षात घेतलं पायजे. स्नेहलची ईन्ष्टाश्टोरी फालतू होती पन ती ग्रेटे. ती मिळाली पायजे. मावशीला भाजणी न्यून दिली. काकांनी ऑडी घेतली. बग म्हणावं बापाला. प्रगतीची त्हान पायजे. स्नेहल? डेटा? ऑडी? पैसा? नोकरी? शिक्षण? मला नक्की काय पायजे?

आज स्नेहलच्या नाटकाला जायचं म्हंजे जायचं. रिलेशनशिप नाय तर सिचुएनशिपतरी मिळेल. नायतर स्कोर कसा वाढणार? लव पायजे.

स्नेहलच्या नाटकातल्या प्रियकराला सुजवला पायजे. माजा डेटापॅक लवकर संपतो कारन हे सर्विस प्रोवायडर चोरेत. डेटा फुकटच पायजे.

आज स्नेहल सोबत स्वामी स्वप्नात आले होते. काय नाय जस्ट हाय करून गेले. डॉक्टरला सांगायला पायजेहेय लव, वेनार यु मिटींग मी? भेटायला पायजे

राजा म्हणला धंदा टाकू. पन त्यासाठी कॅपिटल पायजे. बाप रात्री वायफाय बंद करतो. सेप्रेट वायफाय पायजे. ओटीटीला चिल्ड्रेन्स लॉक? अशानं पोरं कोयते घेतात हे पॅरेंटला कळलं पायजे. आज सुन्नं वाटलं नाय पायजे. सारखं सारखं सुन्नं वाटतंय. च्यायला त्या डॉक्टरला काही अक्कल आहे का? चांगलं औषध दिलं पायजे.

गवरमेंट कडून जागा फुकट मिळवली पायजे. पुढाऱ्यांची पोरं सक्सेसफुल व्हायला हेच करतात हे सोसायटीला कळलं पायजे. स्नेहल कुठल्या डेटिंग ॲपवरे? ते शोधलं पायजे.

डॉक्टरने पुढच्या भेटीत ही पायजे, पायजेची एक क्रियापदी ऐकली. बंडूचा आजार लवकर संपणार नाही याची खात्री वाटून त्याला बरे वाटले.

त्याने चटकन त्याचे जर्नलिंग ॲप उघडून लिहिले...

वेल, एवरी पेशंट शूड बी पर्मनंट. मग त्याने बंडूला जर्नलिंग कंटिन्यू करायला सांगितले आणि गोळ्या बदलून दिल्या. तेव्हा बंडूला सगळं पूर्वीसारखंच वाटत होतं. त्याने फोन काढला अन् लिहिले फिलिंग कॉनफिडंट, आता स्नेहल भेटली पायजे. तेव्हा स्नेहल परदेशी विद्यापीठात तरुण मुलं पाठवायच्या व्यापारात दलाली करणाऱ्या संस्थेच्या कार्यालयात होती. तिच्या बापाने पैशाची काळजी करू नका, असं टेचात म्हटल्यानंतर तिनं चटकन फोन काढून जर्नलमध्ये लिहिलं -

माय फादर द ग्रेटेस्ट.

तेव्हाच बापाने मिटींगनंतर जर्नलमध्ये लिहिण्यासाठी ‘‘बीग वर्डस मॅटर अ लॅाट.’’ ही ओळ मनात योजली. तेव्हा बंडूची आई स्वामींच्या मठात ‘बंडूला बरं वाटू दे’ अशी करुणा भाकत होती आणि बंडूचा बाप सायकॅट्रीश्टचे वाढते बिल चुकते करायला पर्सनल लोन काढण्याच्या विचारात होता. पव्याच्या जामिनानंतरच्या मिरवणुकीच्या छायाचित्रात स्थानिक नगरसेवक झळकत होता. राजा केपीतल्या बंगल्यात फिरून महसूल अधिकाऱ्यांना द्यायला वर्गणी गोळा करत होता. काही जुवेनाईल कोयता फिरवत ड्रग शोधत फिरत होते.

साधेपणातील जगण्याची श्रीमंती, कोकणातील दिवाळी

पुण्यनगरीतली माणसांच्या वांछिताची शोधयात्रा पाहत मुठा कचरा लोटत थकत होती. स्नेहलचे विमान आभाळी उडाले, तेव्हा आभाळातले अदृश्य क्लाऊड जगभरातल्या जर्नलांमधल्या एकेक ओळींनी ओथंबून जात होते. त्या अविरत साचणाऱ्या भावनिक डेट्याचे वर्गीकरण करत यंत्रे प्रत्येकाघरी उलट टपाली पाठवायच्या डेट्याच्या कचऱ्याच्या वेगवेगळ्या राशी रचत होती. कुणी कसं वागावं हे पूर्वीसारखंच आताही आभाळातच ठरतं होतं. बंडूने लिहिलं, ‘‘पायजे ते मिळालं नाही तर बंड करायला पायजे. पायजे ते हिसकावून घेतलंच पायजे.’’ जो जे वांछिल तो ते लाहो! असं लिहिताना ज्ञानदेवांना नक्की काय अपेक्षित होतं? हे लिहून, आजचं जर्नलिंग झालं या कृतार्थ आनंदात मी उत्तररात्री श्रांत निजलो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.